मुंबईः हिंदी ही 'राष्ट्रभाषा' आहे की नाही यावरून बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीत वाद सुरू झाला आहे. कन्नड अभिनेता किच्चा सुदीपने हिंदी ही राष्ट्रभाषा नाही असं विधान केल्याने अजय देवगनने सुदीपला प्रत्युत्तर दिलं होतं. आता हा वाद पुन्हा वाढला आहे.
या वादात आता दिग्दर्शक राम गोपाल वर्माने उडी घेतली आहे. सध्या साऊथच्या चित्रपटांच्या यशाचा सर्वत्र बोलबाला आहे. या यशामुळे आता भाषेबाबत वाद निर्माण झाला आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही असं सुदीपने म्हटल्यानंतर अजय देवगनने त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं, त्यावर सुदीपनेही स्पष्टीकरण दिलं होतं.
मी हिंदीचा आदर करतो मात्र जर मी कन्नड भाषेत ट्विट केलं असतं तर काय झालं असतं, असा सवाल सुदीपने केला आहे. यावर दिग्दर्शक राम गोपाल वर्माने सुदीपला पाठिंबा दिला आहे.
या इंडस्ट्रीत उत्तर आणि दक्षिण असं काही नाही, सर्व भारत एक आहे. भाषा आणि संस्कृती ही आपल्या सर्वांना जोडण्याचं काम करते असं राम गोपाल वर्मा यांनी म्हटलं आहे.
हिंदी ही राष्ट्रभाषा नाही या किच्चा सुदीपच्या ट्विटचं कौतुक करत राम गोपाल वर्मा यांनी सुदीपला पाठिंबा तर दिलाच मात्र या व्यतिरिक्त मोठं वक्तव्य केलं आहे. उत्तरेकडील कलाकार दाक्षिणात्य कलाकारांमुळे स्वतःला असुरक्षित समजतात, तसंच त्यांच्यावर जळतात सुद्धा. कारण कन्नड सिनेमा KGF2ने ओपनिंगलाच 50 कोटींची कमाई केली. त्यामुळे आगामी रिलीज होणाऱ्या हिंदी सिनेमांच्या ओपनिंग कमाईकडे लक्ष लागलं आहे. इतकंच नाही तर राम गोपाल वर्मा यांनी अजय देवगनच्या रनवे 34 लाही आव्हान दिलं आहे.