मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या कित्येक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. स्पष्टच म्हणावं तर या दोघांनीही एकमेकांना या कलाजगतामध्ये घडताना पाहिलं आहे. विविध कार्यक्रम असो, पुरस्कार सोहळे असो किंवा मग एखादी सेलिब्रिटी पार्टी असो, रणबीर आणि आलिया तिथं एकत्रच हजेरी लावताना दिसतात. (Ranbir Kapoor Alia bhatt)
मागच्या वर्षीपासून या जोडीच्या लग्नाच्या चर्चांनी बराच जोर धरला होता. पण, काही गोष्टींची घडी न बसल्यामुळं त्यांचं लग्न लांबलं. कोरोना नसता तर आमचं लग्न केव्हाच झालं असतं असं खुद्द रणबीरही म्हणालाच होता.
ठरली बुवा अखेर तारीख....
आता म्हणे रणबीर आणि आलिया यंदाच्याच वर्षात किंबहुना येऊ घातलेल्या एप्रिल महिन्यातच लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या संपूर्ण बॉलिवूडमध्ये याच जोडीच्या April Wedding ची चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वीच रणबीरची आई, नीतू कपूर यांना सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राकडे गेल्याचं दिसलं होतं. तर, मनिषच्याही कपूर कपूर कुटुंबीयांकडे फेऱ्या पाहायला मिळाल्या होत्या. हे सर्व पाहता नीतू कपूर आता सुनेला घरी आणण्यासाठी कंबर कसून तयारीला लागल्या असल्याचं म्हटलं जात आहे.
ऑक्टोबर 2022 मध्ये होणार होतं लग्न
यापूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार रणबीर आणि आलियाचं लग्न ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचं बोललं गेलं होतं. पण, आता मात्र त्यांचं लग्न एप्रिलमध्येच होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, या सर्व चर्चांपासून दूर ही जोडी सध्या त्यांच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. हल्लीच ते बनारसमध्ये चित्रीकरण करत असल्याचे काही फोटोही व्हायरल झाले होते.
इथे रणबीरच्या कपूर कुटुंबात लग्नाच्या तयारीला वेग आलेला असतानाच तिथं बी- टाऊनमधलं आणखी एक कपूर कुटुंब मात्र आपल्या लेकिच्या ब्रेकअपचं सांत्वन करत आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि प्रियकर रोहन श्रेष्ठा यांच्या नात्याला तडा गेल्यामुळं आता त्यांच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम लागल्याचं म्हटलं जात आहे.