मुंबई : नागराज मंजुळेच्या 'सैराट' सिनेमातून लोकप्रिय ठरलेली नायिका रिंकु राजगुरू आता पुन्हा एकदा नव्या सिनेमासह सज्ज झाली आहे. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना रिंकुने अभिनय क्षेत्रात आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. आतापर्यंत चालत आलेली अभिनेत्रीची व्याख्या मोडत रिंकुने एक नवं समीकरण जगासमोर ठेवलं. नायक प्रदान सिनेमात नायिकेचं वेगळेपण रिंकुने आपल्या अभिनयातून मांडल.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री रिंकु राजगुरूचा दुसरा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकुची प्रमुख भूमिका असलेला कागर हा बहुचर्चित सिनेमा १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्तावर हा चित्रपट प्रेमाचा उत्सव साजरा करणार आहे. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या 'उदाहरणार्थ' या संस्थेने सिनेमाची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचं दिग्दर्शन केलं आहे.
वडील-मुलाच्या नात्यावर आधारित रिंगण आणि चार शाळकरी मुलांची गोष्ट असलेला यंग्राड हे दोन चित्रपट मकरंदनं या पूर्वी दिग्दर्शित केले होते. रिंगण आणि यंग्राड हे दोन्ही चित्रपट भिन्न पद्धतीचे होते. त्यामुळे आता कागर या चित्रपटाविषयी नावापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. मूळचे अकलूजचे असलेले आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले मकरंद आणि रिंकु या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.
कागरचं पोस्टरही वैशिष्ट्यपूर्ण आहे. एका पडद्याआड उभी असलेली रिंकु या पोस्टरमध्ये पहायला मिळते. पोस्टरमध्ये पडदा त्यावर आजूबाजूला असलेल्या वेलींची गराडा अन त्यात रिंकूच्या असलेला दिसण्यातला साज अन नजरेतील करारीपणा एक्स्प्रेशन विलक्षण आहेत. मात्र त्यामुळे कथानकाचा काहीच अंदाज बांधता येत नाही. या पोस्टरमुळे चित्रपटाचं कथानक आणि रिंकुसह असलेल्या स्टारकास्टविषयी उत्सुकता नक्कीच वाढली आहे.