मुंबई : बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं 30 एप्रिल रोजी निधन झालं. त्यांच्या जाण्याने कपूर कुटुंबासह संपूर्ण कलाविश्वावरही शोककळा पसरली आहे. ऋषी कपूर मुंबईतील एच. एन रिलायन्स रुग्णालयात दाखल होते. याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांनी या रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्सेसचे आभार मानले आहेत.
कॅन्सरशी झुंज देताना रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस ऋषी कपूर यांच्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल, नीतू कपूर यांनी त्यांचे धन्यवाद मानले आहेत. नीतू कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन ऋषी कपूर यांचे दोन फोटो शेअर करत डॉक्टर, नर्सेसबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे.
'ऋषी कपूर यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पण या गेल्या काही दिवसांकडे पुन्हा मागे वळून पाहिल्यावर दिसतेय ती केवळ कृतज्ञता - एच.एन रुग्णालयातील डॉक्टरांप्रती कृतज्ञता... डॉ. तारंग ज्ञानचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली असणाऱ्या डॉक्टर, नर्सेस यांच्या संपूर्ण टीमने माझ्या पतीला त्यांनी त्यांच्याच जवळचा व्यक्ती असल्यासारखं वागवलं. आम्ही सर्व त्यांचेच असल्यासारखे सल्ले त्या सर्वांनी आम्हाला दिले. आणि यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते', अशा शब्दांत नीतू कपूर यांनी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेसला धन्यवाद दिले आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून ऋषी कपूर यांची लुकेमिया या आजाराशी झुंज सुरु होती. या कॅन्सरचं निदान झाल्यानंतर ऋषी कपूर उपचारासाठी परदेशातही गेले होते. परदेशात जवळपास एक वर्षापर्यंत उपचार घेतल्यानंतर ते भारतात परतले होते. त्यांची तब्येत ठिक होत आहे असं वाटत असतानाच अचानक त्यांच्या निधनाची बातमी धडकली आणि संपूर्ण कलाविश्वासह चाहत्यांमध्येही शोककळा पसरली.