PHOTO : 'इस्त्रो'च्या नंबी नारायणन यांच्या रुपात दिसणाऱ्या या अभिनेत्याला ओळखलंत का?

नंबी नारायणन हे भारतीय अंतराळ संस्था 'इस्त्रो'चे निवृत्त वैज्ञानिक आहेत

शुभांगी पालवे | Updated: Jan 23, 2019, 02:27 PM IST
PHOTO : 'इस्त्रो'च्या नंबी नारायणन यांच्या रुपात दिसणाऱ्या या अभिनेत्याला ओळखलंत का? title=

मुंबई : भारतीय वैज्ञानिक आणि एअरोस्पेस इंजिनिअर नंबी नारायणन यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यावर बेतलेला 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' हा सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, 'थ्री इडियट'फेम बहुगुणी अभिनेता आर. माधवन यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि अभिनय अशी दुहेरी बाजू सांभाळलीय. आता नंबी नारायण यांच्या रुपातील आर. माधवनचा लूक समोर आलाय. या फोटोमध्ये लांबलचक आणि सफेद दाढीमध्ये माधवनला ओळखणंही कठिण आहे. माधवन यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला फोटो शेअर केलाय. 

थ्री इडियटस्, साला खडूस, तनु वेडस मनू यांसारख्या सिनेमांत दिसलेला आर माधवन या सिनेमात नंबी नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमासाठी अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून आर. माधवन यानं खूपच मेहनत घेतल्याचं दिसतंय. तब्बल साडे तीन वर्ष तो याच प्रोजेक्टवर काम करतोय. नंबी नारायणन यांच्यासारखा लूक मिळवण्यासाठी त्याला तब्बल १४ तास खुर्चीवर बसून राहावं लागलं... ७०-७५ वर्षीय एका व्यक्तीची भूमिका साकारणं हे माझ्यासाठी आव्हान होतं, असं आर माधवन यानं म्हटलंय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

After 14 hrs on the chair.. Who is who is WHO??? #rocketryfilm @tricolourfilm @media.raindrop @vijaymoolan

A post shared by R. Madhavan (@actormaddy) on

नंबी नारायणन यांना माझा लूक पाहून हसू आवरणं कठिण झालं होतं, त्यांनाही हा लूक खूपच आवडला... सेटवर आम्ही दोघे सारखेच दिसत होतो, असंही आर माधवन यानं म्हटलंय. 

'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' या चित्रपटाचा टीझर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित करण्यात आला होता. हा सिनेमा हिंदी, इंग्रजी आणि तमिळ अशा तीन भाषांत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं शुटिंग भारत, प्रिन्स्टन, स्कॉटलंड, फान्स आणि रशियामध्ये पार पडलंय. 

भारताची मंगळयान मोहीम 

'मिशन टू मार्स' हे अमेरिकेचं प्रोजेक्ट ६७१ दशलक्ष डॉलर खर्च आणि १९ व्या प्रयत्नात यशस्वीरित्या पूर्ण झालं होतं. तर रशियानं यासाठी १६ वेळा प्रयत्न आणि तब्बल ११७ दशलक्ष डॉलर्स खर्च केले होते. परंतु, हेच मिशन भारतानं नोव्हेंबर २०१४ मध्ये पहिल्याच प्रयत्नात केवळ ७४ दशलक्ष डॉलर्समध्ये पूर्ण करून दाखवलं होतं. या मोहिमेद्वारे मंगळयानाद्वारे मंगळावर दाखल होण्याचं हजारो भारतीयांची कल्पना भारतीय वैज्ञानिकांनी सत्यात आणून दाखवली होती.   

कोण आहेत नंबी नारायणन?

नंबी नारायणन हे भारतीय अंतराळ संस्था 'इस्त्रो'चे निवृत्त वैज्ञानिक आहेत. ऑक्टोबर १९९४ मध्ये मालदीवच्या मरियम राशिदा या महिलेला अटक तिरुअनंतपुरममध्ये अटक करण्यात आली होती. इस्त्रोच्या स्वदेशी क्रायोजनिक इंजिनच्या ड्राईंगची गुप्त माहिती पाकिस्तानाल पुरवल्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली होती. त्यानंतर नोव्हेंबर १९९४ मध्ये तिरुअनंतपुरममध्ये क्रायोजनिक प्रॉजेक्टचे संयोजक डॉ. नंबी नारायणन यांना अटक करण्यात आली. नारायणन यांच्यासहीत आणखीन दोन वैज्ञानिक डी शशिकुमारन आणि के चंद्रशेखर यांनाही अटक झाली. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता.

नंबी नारायणन यांनी आपल्यावरचे आरोप चुकीचे असल्याचं अनेकदा सांगितलं. या प्रकरणाची चौकशी डिसेंबर १९९४ मध्ये सीबीआयकडे सोपवण्यात आली. सीबीआयनं हे आरोप फेटाळत क्लीन चीट दिली असली तरी तब्बल २४ वर्षांनी सर्वोच्च न्यायालयानं नारायणन यांना निर्दोष घोषित केलं. तसंच न्यायालयानं या निर्दोष वैज्ञानिकांना ५० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले.