मुंबई : मुंबईतील एका कोर्टाने 'सेलमोन भोई' या ऑनलाइन मोबाइल गेमवर तात्पुरती बंदी घातली आहे. हा गेम 'हिट अँड रन' च्या घटनेवर आधारित आहे ज्यात बॉलिवूड अभिनेता सलमान खान सहभागी होता. न्यायाधीश के.एम. जयस्वाल यांनी सोमवारी आदेश जारी केला होता, त्याची प्रत मंगळवारी प्राप्त झाली.
गेम प्ले स्टोअरमधून काढला
कोर्टाने गेम मेकर पॅरोडी स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्या संचालकांना गेम आणि कोर्टाशी संबंधित कोणत्याही सामग्रीचं प्रसारण, लॉन्चिंग किंवा पुन्हा लॉन्चिंग आणि पुनरुत्पादन करण्यापासून प्रतिबंधित केलं आहे. कोर्टाने गेम बनवणाऱ्यांना गूगल प्ले स्टोअर आणि इतर प्लॅटफॉर्मवरून गेम त्वरित काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
सलमानने संमती दिली नाही
कोर्टाने म्हटलं, "प्रथमदर्शनी, खेळ आणि त्याचे फोटो पाहता, असं दिसतं की, तो सलमान खानच्या ओळखीशी जुळतो आणि तो हिट अँड रन प्रकरणाशी संबंधित आहे." न्यायालयाने म्हटलं की, सलमान खानने या खेळासाठी कधीही संमती दिली नाही. कोर्टाच्या आदेशानंतर असं दिसतं की, गेम बनवणाऱ्यांवर टांगती तलवार आहे.
दबंग खानच्या गोपनीयतेचं उल्लंघन
न्यायालयाच्या आदेशात म्हटलं आहे की, "जेव्हा सलमान खानने या गेमच्या निर्मितीसाठी आपली संमती दिली नाही. जी त्याच्या ओळखीशी आणि त्याच्याविरुद्धच्या खटल्याशी अगदी समान आहे, तेव्हा त्याच्या गोपनीयतेच्या अधिकाराचं निश्चितपणे उल्लंघन झालं आहे." त्याची प्रतिमाही खराब झाली आहे.
फायद्यासाठी वापरला गेला
न्यायालयाने म्हटलं की, गेमच्या निर्मात्यांनी सलमान खानची ओळख आणि लोकप्रियता आर्थिक फायद्यासाठी वापरली आहे. दबंग खानने गेल्या महिन्यात गेम निर्मात्यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. याचिकेत म्हटलं होतं की, 'सेल्मन भोई' चा उच्चार त्याच्या 'सलमान भाई' नावाप्रमाणेच खानच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.