मुंबईः आदिलशाहीचा एक अतिशय निर्दयी, क्रूर आणि कपटी सरदार अफझल खान भर दरबारात उठून विडा घेतो आणि शिवाजी नावाच्या वादळाला बंदिस्त करण्याचा निश्चय करतो आणि आपल्या प्रचंड फौझेसह महाराजांचे स्वराज्य काबीज करायला निघतो. एवढेच नव्हे तर वाटेत येणारी हिंदूंची पवित्र मंदिरे तो उध्वस्त करतो. शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान करतो. हिंदू धर्माचा अपमान करतो. या क्रूरकर्म्याच्या दहशतीच्या सावटाने संपूर्ण स्वराज्य ग्रासले जाते.
अफजल खानाला या जावळीच्या खोऱ्याची महती माहीतच नव्हती अन् प्रतापगड काय रसायन आहे याची खबरच नव्हती. युद्ध धुरंदर छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा काय चीज आहे हे त्याला मुळी ठाऊकच नव्हतं. या निर्दयी, क्रूर आणि कपटी सरदार अफझल खान वधाचा थरार म्हणजेच चित्रपट 'शेर शिवराज'.
आपल्या भारत भुमीवर अनेक महान स्त्रियांनी जन्म घेतला आहे. त्यातील महत्वाचे नाव म्हणजे राजमाता जिजाबाई शहाजी भोसले . मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री. जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. हे सर्व त्यांचे गुण त्यांनी शिवरायांना दिले. थोर जिजाऊ यांची भूमिका आजवर अनेक चित्रपट व मालिकांमध्ये लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केली आहे.अर्थात एखादी भूमिका जेव्हा एखादा कलाकार वारंवार करतो तेव्हा त्या भूमिकेशी त्या कलाकाराचे नाते आणखीनच घट्ट होते आणि मग त्या भूमिकेबरोबर तो कलाकार खऱ्या अर्थाने एकरूप होतो.
जिजाऊंची भूमिका सातत्याने साकारल्यामुळे अफजलखान बद्द्ल असलेला जिजाऊंचा राग किती मोठा असू शकतो हे मृणाल कुलकर्णी यांना जाणवले. मृणाल कुलकर्णी यांच्या मते ‘शेर शिवराज’ करताना त्यांना जाणवलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अफजलखानच्या मृत्यूची खात्री महाराजांपेक्षाही जिजाबाईंना जास्त होती.
मृणाल कुलकर्णी सांगतात, "अफझलखान अतिशय निर्दयी, क्रूर आणि कपटी सरदार होता. या अफजल खानामुळे जिजाऊ यांचे पती आणि शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांची हत्तीवरून धिंड काढली होती. हा अफजल खान दगा करून हत्या करत असे. शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधूशी, संभाजीशी कपट करून त्याने त्यांची हत्या घडवून आणली.
जिजाऊ एक शूर राष्ट्रमाता माता सुद्धा होत्या. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. शहाजी महाराजांच्या अपमानाचा बदला आणि संभाजी राजांच्या मृत्यूचा सूड घ्यायचा होताच मात्र रयतेला होणारा त्रास सुद्धा त्यांना असह्य झाला.
शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ याचे शिक्षण जिजाऊंनी शिवरायांना दिले होते. त्यामुळे जेव्हा शिवराय अफजलखानाच्या भेटीला गेले असतील तेव्हा त्या माउलीला रयतेला या संकटातून बाहेर काढणाऱ्या स्वतःच्या मुलाचे साहस आणि फत्ते होणाऱ्या कामगिरीची आधीच खात्री असेल आणि त्यामुळेच मला असं वाटतं की जिजाऊ अफजलखानाच्या मृत्यूच्या बातमीची केवळ वाट पाहत असतील. वर्षोनी वर्षे मनात पचवलेला स्वतःच्या नवऱ्याचा अपमान आणि थोरल्या मुलाच्या खुनाचा बदला, रयतेची या संकटातून सुटका यासाठी शेवटी त्यांच्याच शिवरायांनी अफजलखानाचा गनिमीकाव्याने वध करून घेतलाच, असे उत्तर यावेळी मृणाल कुलकर्णी यांनी दिले.
शिवरायांनीही लगोलग अफजलखानाचे शीर जिजाऊंसाठी गडावर पाठवून एका प्रकारे आपल्या आईचे स्वप्न पूर्ण केले. अर्थात हा थरार रविवार १४ ऑगस्टला दुपारी १२.०० वा. 'शेर शिवराज' , या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर मध्ये झी टॉकीज वर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.