मुंबई : बहुचर्चित 'शेरनी' सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. या सिनेमात विद्या बालन प्रमुख भूमिकेत असून एका करारी वन अधिकाऱ्याच्या निश्चयी भूमिकेत झळकणार आहे. न्यूटन’फेम, पारितोषिक विजेता फिल्ममेकर अमित मसुरकर याने या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. आपल्या पितृसत्ताक पद्धतीत सामाजिक अडथळे निर्माण करणारी मानवी श्वापदे वावरत असतात, विद्या ज्या विभागात कार्यरत असते, तिथली उदासीनताच तिला जोशाने स्वत:ची धमक सिद्ध करण्याची ऊर्जा देते. सिनेमाचा ट्रेलर रोमांचक असून विद्याच्या प्रवासावर भाष्य करतो.
हे जग चमत्कारी, आपल्या अनुभवाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तिरेखांनी भरलेले आहे. आपली चाकोरी बाहेरची नोकरी सांभाळून विद्या विवाहित आयुष्य जगत असते. हे करत असताना मानव नावाच्या पशूचा सामना तिला करावा लागतो. या सिनेमात शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राझ, इला अरूण, ब्रिजेंद्र काला आणि नीरज काबी यांच्या मुख्य भूमिका असतील.
दिग्दर्शक अमित मसुरकर म्हणाला की, “शेरनी’च्या कथानकाला काटेरी पैलू आहेत. या निमित्ताने मनुष्य आणि पशू यांच्यातील संघर्षाची जटिलतेचा वेध घेण्यात आला आहे. विद्या बालनने मीड-लेव्हल फॉरेस्ट ऑफिसरची व्यक्तिरेखा साकारली असून अडथळे आणि तणावपूर्ण स्थितीतही ती आपल्या टीम व स्थानिकांसह पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम करत असते. विद्या, अन्य सुंदर कलाकार आणि फारच प्रतिभावान क्रूसोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. अमेझॉन प्राईम व्हिडीओ’वर शेरनी प्रसिद्ध होणार असल्याने ही कथा भारत आणि जगभर विस्तृत तसेच वैविध्यपूर्ण प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला मदतीची ठरेल.”
ट्रेलर लॉन्चप्रसंगी स्वत:चा उत्साह व्यक्त करताना अभिनेत्री विद्या बालन म्हणाली की, “मी पहिल्यांदा शेरनी’चे कथानक ऐकले आणि ते मला भावले. मी व्यक्तिरेखेत शिरले. मी साकारत असलेली सिनेमातील विद्या काही शब्दांत समजावून घेता येईल. मात्र व्यक्तिरेखेचे अनेक पैलू आहेत. या सिनेमाचा विषय अतिशय संवेदनशील आहे. आदर, परस्परांना समजून घेणे आणि सह-अस्तित्वाच्या धाग्यांनी गुंतलेले आहे. ते केवळ मानव-पशू द्वंद नसून माणसा-माणसातील नात्यांवर भाष्य करणारे आहे. ही अभिनव व्यक्तिरेखा साकारताना मला फारच आनंद झाला. अमेझॉन प्राईम व्हिडियोच्या माध्यमातून हे कथानक जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना अनपेक्षित मार्गांनी गुंतवून ठेवेल ही आशा बाळगते.” भारत आणि २४० हून अधिक देश-प्रदेशातील प्राईम सदस्यांना 18 जूनपासून अमेझॉन प्राईम व्हिडीओवर ‘शेरनी’ पाहता येणार आहे.