या अभिनेत्याचे नाव आहे सिद्धार्थ मल्होत्रा. या अभिनेत्याने 'माय नेम इज खान' या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोलसारख्या दिग्गज कलाकारांसोबत करण जोहरच्या टीममध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल टाकले. त्याची मेहनत आणि समर्पण पाहून करणने त्याला आपल्या 'स्टुडंट ऑफ द इयर '(2012) या चित्रपटात अभिनयाची संधी दिली. या चित्रपटात त्याने वरुण धवन आणि आलिया भट्ट या दोन स्टार किड्ससोबत काम केले आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.
त्याच्या करिअरच्या सुरुवातीला त्याला केवळ 2500 रुपयांची कमाई मिळाली होती, मात्र त्याने आपल्या कर्तृत्वाने हे सिद्ध केले की मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते. त्याने पुढे 'हसी तो फसी', 'एक व्हिलन', 'कपूर अँड सन्स', 'बार बार देखो', 'ब्रदर्स' आणि 'जेंटलमन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्याच्या प्रत्येक भूमिकेत विविधता आणि प्रेक्षकांवर प्रभाव टाकणारी व्यक्तिमत्त्वाची झलक दिसली. 2021 साली प्रदर्शित झालेल्या 'शेरशाह' चित्रपटामुळे त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात त्याने कारगिल युद्धातील शूरवीर कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारली होती, ज्यासाठी त्याला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांकडून खूप कौतुक मिळाले.
ओटीटी प्लॅटफॉर्मवरही सिद्धार्थने आपली छाप सोडली आहे. रोहित शेट्टीच्या भारतीय पोलिस दलावर आधारित वेब सिरीजमधून त्याने डिजिटल माध्यमात पदार्पण केले आणि आपला फॅनबेस अधिक विस्तारित केला.
वैयक्तिक जीवनातही सिद्धार्थ चर्चेत राहिला आहे. 2023 मध्ये त्याने त्याच्या 'शेरशाह' चित्रपटातील सहकलाकार कियारा अडवाणी हीच्याशी लग्न केले. सूर्यगढ पॅलेस, जैसलमेर येथे त्यांचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. हे जोडपे आता बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रिय जोडप्यांपैकी एक मानले जाते.
सिद्धार्थच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये 'फोर्स ऑफ द फॉरेस्ट' आणि 'रेस 4' यांसारखे मोठे चित्रपट आहेत, ज्यामुळे त्याच्याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आपल्या मेहनतीच्या आणि अभिनय कौशल्यांच्या जोरावर सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये स्वतःचे एक खास स्थान निर्माण केले आहे.