57000 च्या गुंतवणुकीवर दर दिवशी 4000 चा परतावा; ED कडून Tamannaah Bhatia ची चौकशी, प्रकरण आहे तरी काय?

Entertainment News : आर्थिक अफरातफरीप्रकरणी नवा सुगावा... अभिनेत्री तमन्ना भाटियाची ईडीकडून चौकशी. पहिल्यांदा तारीख टाळल्यानंतर आता....  

सायली पाटील | Updated: Oct 18, 2024, 02:08 PM IST
57000 च्या गुंतवणुकीवर दर दिवशी 4000 चा परतावा; ED कडून Tamannaah Bhatia ची चौकशी, प्रकरण आहे तरी काय?  title=
Tamannaah Bhatia ED enquiry money laundering

Entertainment News : खासगी जीवनामुळं आणि कलाकृतींमुळं कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या एका वेगळ्या आणि तितक्याच गंभीर कारणामुळं लक्ष वेधताना दिसत आहे. प्रवर्तन निदेशालय अर्थात ईडीनं गुरुवारी बी टाऊनच्या या बहुचर्चित अभिनेत्रीला चौकशीसाठी बोलवलं. एचपीझेड टोकन मोबाईल अॅपशी संबंधित चौकशीसाठी तिला बोलवण्यात आलं, त्यामध्ये कथित स्वरुपात बिटकॉईन आणि इतर काही क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून गुंतवणुकदारांची फसवणूक करण्यात आली होती. 

अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार गुवाहाटीतील ईडी झोनल ऑफिसमध्ये प्रिवेंशन ऑफ मनी लॉण्ड्रींग कायद्याअंतर्गत अभिनेत्रीचा जबाब नोंदवण्यात आला. अभिनेत्रीला सदर अॅपसाठी काही निधी मिळाला असून, सध्या हे अॅप वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानं अभिनेत्रीचीही चौकशी करण्यात आली. दरम्यान या चौकशीसत्रामध्ये तमन्नाविरोधात कोणतीही चार्जशीट दाखल करण्यात आली नसून, यापूर्वीसुद्धा तिला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. पण, कामानिमित्त तिनं या चौकशीला जाणं टाळलेलं. 

काय आहे नेमकं प्रकरण? 

मार्च महिन्यातच या प्रकरणात आरोप पत्र दाखल करण्यात आलं होतं. ज्यामध्ये जवळपास 299 संस्थांची नावं आरोपी म्हणून नोंदवण्यात आली असून, त्यामध्ये 76 संस्था चीनच्या नियंत्रणात असल्याचं म्हटलं जात आहे, 10 संचालक चिनी आहेत तर, दोन संस्थांची मालकी परदेशी नागरिकांकडे आहे. 

हेसुद्धा वाचा : गंगा नदीनं तळ गाठताच समोर आला रेल्वे रुळ; इथं कधी धावली Train? सर्वांनाच पडला प्रश्न 

 

पोलिसांच्या माहितीनुसार  एचपीजेड टोकन मोबाइल फोन अॅपचा वापर आरोपींकडून गुंतवणुकदारांची फसवणूक करण्यासाठी केला आणि हे कृत्य लपवण्यासाठी अॅपशी संलग्न बँक खाती आणि मर्चंट आयडी बनावट संचालकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या शेल कंपन्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आले होते. 

ईडीच्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणात 57 हजार रुपयांच्या गुंतवणुकीमध्ये तीन महिने दर दिवशी 4000 रुपयांचा परतावा देण्याचा दावा करण्यात आला होता. पण, हा परतावा एकदाच देण्यात आला आणि यानंतर लगेचच गुंतवणुकदारांकडून नव्यानं रकमेची मागणी करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात ईडीनं तपाससत्र हाती घेत देशभरातून तब्बल 455 कोटी रुपयांची अचल संपत्ती आणि रोख रक्कम जप्त केली. या प्रकरणात आता पुढे नेमका कोणता खुलासा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.