मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि आयुष्मान खुराणा यांनी यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान पटकावत बाजी मारली. त्यानंतर या दोन्ही अभिनेत्यांचा सध्या बी-टाऊनमध्ये चांगलाच बोलबाला झाला आहे. या दोघांना घेण्यासाठी निर्मात्यांकडून चढाओढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोघांचा भाव चांगलाच वधारला आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत गॉड फादर नसतानाही दोघांनीही स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करत यशाचे शिखर गाठले आहे. तसेच दोघांवर तरुणी जीव ओवाळून टाकण्यास राजी आहे. विकी कौशलच्या प्रेमात पडण्यासाठी मुली एका पायवर तयार आहेत. तर आयुष्मान खुराणा ज्याचा अभिनय बी-टाऊनला तोंडपाठ आहे. या दोन हरहुन्नरी अभिनेत्यांचा सध्या चांगलाच भाव वधारल्याचे दिसत आहे.
संजू चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या विकीला बिग बजेट चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. 'संजू'मधील 'कमली' असो की राजीमधील शांत असणारा इक्बाल असो किंवा मग 'उरी'मधील मेजर विहान सिंग असो. सर्वच चित्रपटांमध्ये विकी भाव खावून गेला. विकी लवकरच भूत, सरदार उद्दम सिंग, तख्त या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.मोठ्या पडद्यावर विकीला पुन्हा पुन्हा दमदार भूमिकेत पाहण्याची जणू प्रेक्षकांना चटकच लागली. विकीने फिल्मफेअरपासून ते अगदी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.
विकीसोबत आणखी एक नाव सध्या बी-टाऊनमध्ये वेगाने पुढे येताना दिसत आहे. ते म्हणजे अभिनेता आयुष्मान खुराणा. विकी डोनर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपले नाणे चमकवायला निघालेल्या आयुष्मानने बॉलिवूडमधील बड्या बड्या अभिनेत्यांना मागे टाकत यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान पटकावला.
आयुष्मानने सुरुवातील जाहिरातींसाठी एक कोटींचे मानधन घेत होता. राष्ट्रीय पुरस्कारानंतर आयुष्मानने जाहिरातीसाठी तीन कोटींची मागणी केल्याचे बातमी आहे. 'बधाई हो', 'अंधाधून', 'आर्टीकल १५' या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवत मोठा चाहतावर्ग निर्माण केला. याच आयुष्मानचे आगामी 'ड्रीम गर्ल', 'शुभ मंगल' ज्यादा सावधान सिनेमे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी लवकरच सज्ज होत आहेत. राष्ट्रीय पातळीवर आकर्षण ठरलेले हे बॉलिवूडचे दोन आघाडीचे अभिनेते सध्या यशाची चव चाखत बी-टाऊनमध्ये आपला नवा अध्याय लिहिण्याच्या मार्गावर आहेत, अशी चर्चा आहे.