मुंबई : गानकोकिळा लता मंगेशकर यांची अनेक गाणी आजही अनेकांच्या मनात घर करुन आहेत. लतादीदींचं 'एक प्यार का नगमा है' हे त्यापैकीच एक गाणं. मात्र आता या गाण्याची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा सुरु आहे. एका महिलेने 'एक प्यार का नगमा है' गाणं गायलं आहे. या गाण्याला सर्वांचीच पसंती मिळत आहे.
या महिलेचा आवाज अतिशय सुरेल असून तिने अगदी भावपूर्ण गायलेलं हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या महिलेकडे पाहून ती गरिब कुटुंबातील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गाणं गायलेल्या महिलेने गाण्याचं कोणतंही शिक्षण घेतलं नसल्याचं दिसतंय. ती गायकही नाही. मात्र तिने या गाण्याची सुंदरता कायम राखत अतिशय सुरेखपणे गाणं म्हटलं आहे.
'डीएनए'ने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ पश्चिम बंगालच्या राणाघाट स्टेशनवरील असल्याचं म्हटलं आहे. ही महिला अनेकदा याठिकाणी लता मंगेशकर यांची गाणी गुणगुणत असल्याचंही म्हटलं जातयं.
1972 मध्ये आलेल्या 'शोर' या चित्रपटातील हे गाणं आहे. हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलं असून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी त्याला संगीत दिलं आहे. 'शोर' चित्रपटातून मनोज कुमार, नंदा, मास्टर सत्यजीत रे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.