ए आर रहमाननं का स्वीकारला इस्लाम? हिंदू ज्योतिषानं ठेवलं मुस्लिम नाव

A R Rahman Converted :  ए आर रहमाननं एका मुलाखतीत इस्लाम धर्म का स्वीकारला आणि मुस्लिम नाव एका हिंदू ज्योतिषानं सुचवल्याचं सांगितलं. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 6, 2025, 12:31 PM IST
ए आर रहमाननं का स्वीकारला इस्लाम? हिंदू ज्योतिषानं ठेवलं मुस्लिम नाव title=
(Photo Credit : Social Media)

A R Rahman Converted : भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय म्यूजिक डायरेक्टर ए आर रहमाननं आपल्या देशाचं नाव संपूर्ण जगात केलं आहे. ए आर रहमानवर जगभरातून लोकं प्रेम करतात आणि त्याचा म्युजिकची स्तुती करतात. आज 6 जानेवारी रोजी ए आर रहमानचा 57 वा वाढदिवस आहे. ए आर रहमान नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. त्यातही नेहमीच जी गोष्ट चर्चेत असते ती म्हणजे ए आर रहमाननं धर्म का बदलला होता. आज त्याच्या वाढदिवसानिमित्तानं आपण त्याविषयी जाणून घेऊया.

ए आर रहमाननं 1980 च्या दशकात मुस्लिम धर्म स्वीकारला. त्या आधी तो हिंदू होता अर्थात त्याचा जन्म हा एका हिंदू कुटुंबात झाला होता. पण काही वर्षानंतर त्यानं इस्लाम धर्म स्वीकारला. या मागचं कारण काय होतं हे ए आर रहमाननं 2000 मध्ये बीबीसीच्या एका टॉकशोमध्ये सांगितलं होतं. ए आर रहमाननं सांगितलं की एक सूफी होते ज्यांनी त्याच्या वडिलांच्या शेवटच्या काळात उपचार केला होता. त्यावेळी त्याचे वडील हे कॅन्सरला लढा देत होते. त्यानंतर जेव्हा तो आणि त्याचं कुटुंब 7-8 वर्षांनंतर सूफीला भेटले तेव्हा त्यांनी धर्म परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला. ए आर रहमान सांगितलं की 'एक सूफी होते, जे माझ्या वडिलांवर त्यांच्या शेवटच्या काळात उपचार करत होते. 7-8 वर्षानंतर आम्ही त्यांना भेटलो आणि आम्ही दुसरा आध्यात्मिक मार्ग निवडण्याचं ठरवलं आणि आम्हाला त्यातून शांती मिळाली.'

हेही वाचा : सोहानं वडिलांच्या थडग्यावर ठेवला केक; लोक संतापून म्हणाले, 'इस्लाममध्ये हे मान्य नाही, अल्लाह...'

नसरीन मुन्नी कबीरच्या AR. Rahman: The Spirit of Music मध्ये ए आर रहमाननं सांगितलं की माझी आई हिंदू धर्माचे पालन करायची. तिचा नेहमीच आध्यात्माकडे थोडा झुकाव होता. हबीबुल्लाह रोडच्या ज्या घरात आम्ही राहायचो त्याच्या भिंतीवर हिंदू धार्मिक चित्र होते. त्यात आणखी एक फोटो होता. ज्यात तिनं जिससला मिठी मारली होती आणि मक्का आणि मदीनाच्या पवित्र स्थळांचे देखील एक-एक फोटो होते. 

नाव का बदललं?

दरम्यान, ए आर रहमानचं नाव आधी दिलीप कुमार होतं. त्यांचं नाव बदलण्याविषयी त्यानं सांगितलं की खरं हे आहे की मला माझं नाव कधीच आवडलं नव्हतं. दिग्गज कलाकार दिलीप कुमार यांचा मला अपमान करायचा नाही, पण मी स्वत: ला जेवढं ओळखतो त्याप्रमाणे ते नाव मला शोभत नव्हतं. 

हिंदू ज्योतिषानं सुचवलं नाव!

ए आर रहमाननं सांगितलं की त्याचं नाव एका हिंदू ज्योतिषानं दिलं होतं. धर्म बदलण्या आधी त्याचं संपूर्ण कुटुंब हे त्याच्या लहान बहिणीची जन्म पत्रिका घेऊन ज्योतिषाकडे गेले होते. त्यांना तिचं लग्न करायचं होतं. त्यावेळी ए आर रहमाननं त्याचं नाव बदलण्याविषयी ज्योतिषाशी चर्चा केली तेव्हा ज्योतिषानं अब्दुल रहमान किंवा अब्दुल रहीम नाव ठेवण्याचा सल्ला दिला. तर त्यापैकी कोणतंही नाव योग्य ठरेल असं त्यांनी सांगितलं. एका हिंदू ज्योतिषनं मला माझं मुस्लिम नाव दिलं होतं.