मुंबई : पूजा बेदीची मुलगी आणि अभिनेत्री आलिया फर्निचरवाला सध्या तिच्या आगामी 'श्रीकांत' सिनेमामुळे चर्चेत आहे. आलिया या आगामी चित्रपटात अभिनेता राजकुमार रावसोबत दिसणार आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने पूजा तलवारच्या यूट्यूब चॅनेलसाठी दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीतील तिच्या अनुभवाबद्दल खुलेपणाने बोलली आहे. यावेळी बोलताना ती म्हणाली की, चित्रपटसृष्टीत महिला आणि पुरुषांना ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते त्यात खूप फरक आहे. तिच्या मते, इंडस्ट्रीत अभिनेत्रींसोबत खूप भेदभाव केला जातो.
‘फ्रेडी’अभिनेत्री आलाया एफने दिलेल्या मुलाखतीत पुढे सांगितलं की, तिला वाईट वातावरणातही काम करावं लागलं आणि त्यादरम्यान तिला अनेक 'भयानक' अनुभवांनाही सामोरं जावं लागलं. याविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली, 'असे काही चित्रपट आहेत ज्याच्या सेटवर मला भयानक अनुभव आले आहेत. तुम्ही अशा लोकांसोबत काम करत आहात ज्यांना तुमची पर्वा नाही. त्यांना खरोखर तुमचं हित नको आहे. आपण स्वतःचं रक्षण केलं पाहिजे. तुम्हाला अशा परिस्थिती हाताळाव्या लागतील ज्यामध्ये तुमच्याशी चांगली वागणूक दिली जात नाही. माझ्यासाठी हा सर्वात मोठा धक्का होता, कारण मी इंडस्ट्रीत काही काळ घालवल्यानंतर हे घडलं आहे.
अभिनेत्री पुढे म्हणाली, 'इंडस्ट्रीमध्ये महिला आणि पुरुषांना खूप वेगळी वागणूक दिली जाते. हे आपण विसरू नये. मी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे ज्याच्या सेटवर मला खूप चांगली वागणूक मिळाली आहे. तर काही सेट असे होते की जिथे मला अजिबात बरं वाटायचं नाही.
2020 मध्ये आलेल्या 'जवानी जानेमन' या चित्रपटातून आलिया एफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती कार्तिक आर्यनसोबत ‘फ्रेडी’ चित्रपटात दिसली. शेवटची आलिया अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात दिसली होती.
राजकुमार रावच्या 'श्रीकांत' सिनेमातील अभिनेत्री आलिया एफ तिच्या मनमोहक सौंदर्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरही तिची खूप चर्चा होत आहे. अक्षय कुमारच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटातील आलिया एफकेच्या गाण्याने इंटरनेटवर चांगलीच चर्चा रंगवली होती.