मुंबई : जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसतायत. हा व्हायरस एका देशातून दुसऱ्या देशात पसरत असल्याने जगाची चिंता वाढलीये. अशातच एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे डायग्नोस्टिक कंपनी Genes2Me ने मंगळवारी मंकीपॉक्स Virusसाठी रिअल-टाइम पीसीआर-आधारित किट विकसित केलं आहे.
POX-Q मल्टिप्लेक्स्ड असलेलं हे RT-PCR किट 50 मिनिटांपेक्षा कमी वेळेत निकाल देणार असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
Genes2Me चे CEO आणि संस्थापक नीरज गुप्ता यांच्या म्हणण्याप्रमाणे, “आरोग्यसेवेत वेळेत क्लिनिकल चाचण्या महत्त्वाच्या आहे. वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन आम्ही मंकीपॉक्ससाठी हे आरटी पीसीआर लॉन्च केला आहे, जो सर्वाधिक अचूकतेसह 50 मिनिटांपेक्षा कमी वेळेत निकाल देईल”
कंपनीची सध्या आठवड्यातून 50 लाख चाचणी किट तयार करण्याची क्षमता आहे. दरम्यान अतिरिक्त मागणी आल्यास ही संख्या दिवसाला 20 लाखांपर्यंत वाढवली जाऊ शकते, अशी माहिती सीईओ यांनी दिली आहे. पॉइंट ऑफ केअर सोल्युशनचा वापर रुग्णालयं, विमानतळ, निदान प्रयोगशाळा, आरोग्य शिबिरांसह अनेक ठिकाणी स्क्रीनिंगसाठी केला जाऊ शकतो.
आतापर्यंत 75 देशांमध्ये मंकीपॉक्सची 16,000 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. भारतातही या व्हायरसचे 4 रुग्ण आढळलेत. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केलीये.
डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सांगितलं की, मंकीपॉक्सची समस्या विशेषतः नवीन देश आणि प्रदेशांमध्ये वेगाने पसरतोय. कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेले लोक, गर्भवती महिला आणि मुलांसह असुरक्षित लोकांमध्ये मंकीपॉक्सचा धोका सर्वाधिक आहे.