UV rays affect your vision: थेट सूर्यप्रकाशातून येणारी अतिनील किरणे अर्थात यूव्ही किरणे , त्यांचा तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. या किरणांमुळे तत्काळ अस्वस्थता वाटते आणि दीर्घकालीन दुष्परिणामही होऊ शकतो. त्यामुळे कडक ऊन असलेल्या किंवा बर्फाळ वातावरणात तुमच्या डोळ्यांची संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अतिनील किरणांचा तुमच्या डोळ्यांवर कशाप्रकारे परिणाम होऊ शकतो याबद्दल जाणून घेऊयात डॉ अग्रवालस् डोळ्यांचे हॉस्पिटल, पिंपरी चिंचवाड़, पुणे येथील मोतीबिंदू सर्जन आणि मेडिकल रेटीना नेत्ररोग तज्ञ डॉ. सोनल इरोले यांच्याकडून...
डोळ्याच्या पुढील बाजूस असलेल्या पारपदर्शक पृष्ठभागाला कॉर्निया म्हणतात. प्रकाशानुसार दृष्टी केंद्रीत करण्यासाठी कॉर्नियाची मदत होते. सूर्यप्रकाश किंवा बर्फातील अतिनील किरणे पृष्ठभागाची झीज करतात. परिणामी, फोटोकेरॅटायटिस होऊ शकतो. याला काही वेळा 'स्नो ब्लाइंडनेस (बर्फांधळेपणा)' असेही म्हणतात. डोळे चुरचुरणे, लालसर होणे, प्रकाशाप्रती संवेदनशील होणे, डोळ्यातून पाणी येणे ही याची काही लक्षणे आहेत. डोळ्याच्या पृष्ठभागावर होणाऱ्या सूर्यदाहाप्रमाणेच फोटोकेरॅटायटिसमध्ये प्रचंड वेदना होतात. कडक ऊन असेल किंवा बर्फाळ वातावरण असेल तर हे टाळण्यासाठी अतिनीलकिरणे अडविणारे सनग्लासेस घाला. वर नमूद केलेली लक्षणे दिसली तर लगेचच नेत्रचिकित्सातज्ज्ञांची भेट घ्या.
अतिनील किरणांशी संपर्क आल्याने सेंट्रल व्हिजनवर (मध्य दृष्टी) परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दृष्टिपटलाला, विशेषतः नेत्रबिंदूला हानी पोहोचू शकते. त्यामुळे डोळ्यांना पुरेसे संरक्षण नसेल तर दृष्टीला कायमस्वरुपी हानी पोहोचू शकते आणि तात्पृरते अंधत्व येऊ शकते. दृष्टिपटलाचे आरोग्य राखण्यासाठी आणि नेत्रबिंदूचा ऱ्हास होऊ नये, जे वृद्धांना अंधत्व येण्याचे प्रमुख कारण असते, यासाठी 100% यूव्ही प्रोटेक्शन असलेले सनग्लासेस घालणे आवश्यक आहे.
दीर्घकाळ अतिनील किरणांच्या संपर्कात आल्यास त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. बेसल आणि स्क्वामस सेल कार्सिनोमा सारखे कर्करोग विशेषतः डोळ्यांच्या पापण्यांवर होण्याची शक्यता असते. डोळ्यांभोवतालची त्वचा खूप संवेदनशील असते. डोळे पूर्णपणे झाकणारे सनग्लासेस, रूंद कडांची टोपी घालणे आणि डोळ्यांभोवती सनस्क्रीन लावणे यामुळे हा धोका कमी करता येतो.
पॅटेरिजियम ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये डोळ्याच्या श्वेतलापटलावर ऊतकांची वाढ होते आणि ती डोळ्याच्या कॉर्नियावर पसरू शकते. यूव्ही किरणांच्या जास्त संपर्कात आल्यामुळे हा परिणाम होतो. या वाढीमुळे डोळ्याच्या बाहुली झाकली गेली किंवा अॅस्टिग्मॅटिझम निर्माण केला, तर दृष्टीला अडथळा निर्माण होऊ शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये पॅटेरिजियम काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागू शकते. जिथे अतिनील करणांचा संपर्क अधिक असतो म्हणजे विषुववृत्ताजवळील भाग किंवा बर्फाच्छादित प्रदेशातील लोकांना याचा अधिक धोका असतो.
यूव्ही रेडिएशनमुळे मोतिबिंदू विकसित होऊ शकतो. मोतिबिंदू झाल्यास डोळ्यांमधील नेत्र भिंग (लेन्स) पांढुरकी होते आणि दृष्टी धुसर होते. कालांतराने, अतिनील किरणांचा संपर्क जास्त झाल्यास मोतिबिंदूची वाढ होऊ शकते, विशेषतः वृद्धांमध्ये मोतिबिंदू विकसित होण्याची शक्यता जास्त असते. यूव्ही-ब्लॉकिंग सनग्लासेस घातल्याने मोतिबिंदू विकसित होण्याला विलंब किंवा प्रतिबंध केला जाऊ शकतो.
अतिनील किरणांच्या संपर्कात आल्याने प्रकाशाप्रती संवेदनशीलता निर्माण होते. याला फोटोफोबिया असेही म्हणतात. जे लोक खूप वेळ बर्फाळ वातावरणात किंवा ऊन्हात असतात त्यांना अस्वस्थ वाटू शकते, डोकेदुखी होऊ शकते किंवा ऊन असेल तर स्पष्ट दिसणे कठीण जाते. यूव्ही किरणांना अडवणारे सनग्लासेस किंवा रुंद कडा असलेल्या टोपीचा वापर केल्यास प्रकाशाची तीव्रता कमी करता येते, ज्यामुळे घराबाहेर करायच्या कृती अधिक आरामात करता येतात.
यूव्ही किरणांचा संपर्क डोळ्यांच्या कोरडेपणाच्या आजाराला (ड्राय आय सिंड्रोम) कारणीभूत ठरू शकतो. या स्थितीत डोळे पुरेशा प्रमाणात अश्रू तयार करत नाहीत किंवा योग्य दर्जाचे अश्रू निर्माण करत नाहीत. यामुळे डोळ्यांत अस्वस्थता, लालसरपणा आणि धुसर दिसणे अशी स्थिती उद्भवू शकते. यूव्ही किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण केल्याने डोळ्यांच्या पृष्ठभागावर ओलाव्याचे प्रमाण टिकून राहते आणि हा त्रास वाढण्यापासून रोखता येतो.