लंडन : कोरोनाची साथ पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनत चालली आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट दिसून येतेय. मात्र चीन आणि काही युरोपिय देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप पहायला मिळतोय. दरम्यान तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, अशा परिस्थितीत बेजबाबदारपणे वागणं धोक्याचं ठरू शकतं.
WION मध्ये दिलेल्या वृत्तानुसार, ओमायक्रॉनचा अधिक संसर्गजन्य BA.2 हा व्हेरिएंट युरोप आणि चीनच्या काही भागांमध्ये वेगाने पसरतोय. मार्चमध्ये या व्हेरिएंटच्या नवीन प्रकरणांची नोंद झालीये. तसंच या व्हेरिएंटमुळे चीनच्या शांघाय शहरात लॉकडाऊनंही लावण्यात आलं आहे. गेल्या दोन वर्षात लावला नसलेला मोठा लॉकडाऊन या ठिकाणी आता लावण्यात आला आहे.
मार्च या महिन्यामध्ये फ्रान्स, इटली, जर्मनी आणि ब्रिटनमध्येही कोरोनाच्या प्रकरणांची झपाट्याने नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर अमेरिकेत 'कोरोना रिटर्न'चा इशाराही देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे चीनमध्येही पुन्हा एकदा कोरोनाची पसरत असल्याने आरोग्य यंत्रणांचा ताण वाढला आहे.
कोरोनाचा सब व्हेरिएंट BA.2 हा ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटच्या एकत्रित येण्याने तयार झाला आहे. हा व्हेरिएंट पूर्वीच्या व्हेरिएंटच्या मानाने अधिक संक्रामक आणि वेगाने पसरला जाणार असल्याचं मानलं जातंय. या व्हेरिएंटच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये फुफ्फुसांसंदर्भातील लक्षणं दिसून येत नाहीत. तसंच आता BA.2 च्या व्हेरिएंटची दोन अजून लक्षणं समोर आली आहेत. यामध्ये चक्कर येणं आणि थकवा यांचा समावेश आहे.
संशोधकांनी कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांच्या कान, नाक आणि घशाशी संबंधित तक्रारी जाणून घेतल्या. यामध्ये अधिकतर रूग्णांना घशाला सूज आल्याचं दिसून आलं होतं. सामन्य घसा खवखवण्यापेक्षा ही समस्या वेगळी होती. जर असा त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.