मुंबई : गेल्या २ वर्षांपासून आपण कोरोनाच्या महामारीशी लढा देतोय. डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरिएंट लसीकरण केलेल्या लोकांवर देखील परिणाम करताना दिसतोय. ओमायक्रॉनचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसर्या व्यक्तीमध्ये त्वरित पसरू शकतो. तर दुसरीकडे ओमायक्रॉमधून बरं झाल्यानंतर लक्षणं समजून घेणं आणि त्यांना प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करणं देखील खूप महत्वाचं आहे. असं न केल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते.
ओमायक्रॉनमधून बरं झाल्यानंतर दिसतात ही लक्षणं
ओमायक्रॉनमधून बरं झाल्यानंतर तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो. ज्यामुळे तुमचं झोपेचं चक्र बिघडू शकतं. यामुळे तुम्हाला अशक्तपणा आणि थकवाही जाणवेल. निद्रानाशामुळे तुमची स्मरणशक्ती आणि काम करण्याची क्षमता या दोघांवरही परिणाम होऊ शकतो.
कोरोनाच्या संसर्गाचा तुमच्या आतड्यांवरही परिणाम होऊ शकतो. आणि यामुळे तुम्हाला पोटदुखीची समस्या उद्भवू शकते. कोरोनाच्या संसर्गादरम्यान विषाणू तुमच्या आतील पडद्याला हानी पोहोचवतो. ज्या लोकांना यकृताची समस्या आहे त्यांच्यासाठी ही समस्या धोकादायक ठरू शकते.
ओमायक्रॉन फुफ्फुसाऐवजी तुमच्या घशात संसर्ग पसरवतो ज्यामुळे कफ आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो. ही समस्या ओमायक्रॉनमधून बरं झाल्यानंतरही कायम राहू शकते. खोकल्याची समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ओमायक्रॉनमधून बरं झाल्यानंतर, लोकांच्या मानसिक आरोग्यावर खूप परिणाम होताना दिसतोय. ज्यामुळे लोकांच्या एकाग्रता आणि स्मरणशक्तीवर देखील परिणाम होतोय. रुग्णाने या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये, वेळीच डॉक्टरांची मदत घ्यावी.
कोरोनाच्या काळात हार्मोन्स, आहार आणि तणावामुळे लोकांना केस गळण्याची समस्या होऊ शकते. याशिवाय शरीरात अशक्तपणा जाणवत असल्याने शरीरातील प्रोटीनच्या समस्येमुळे केस गळणंही सुरू होतं.