मुंबई : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. तर दुसरीकडे लसीकरण मोहिमेला देखील वेग देण्यात येतो आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरताना दिसतेय. लस घेतल्यानंतर रूग्णांमध्ये सौम्य प्रकारची कोरोनाती लक्षणं दिसून येतात. भारतात आतापर्यंत कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींचा वापर करण्यात येत आहे.
लस घेतल्यानंतर त्याचे काही परिणाम देखील दिसून आलेत. ताप येणं, डोकेदुखी, हातदुखी अशा समस्या उद्भवत असल्याचं समोर आलं आहे. लसीकरणानंतर येणाऱ्या या समस्या फार सौम्य असून त्यासाठी घाबरण्याची गरज नाही. मुख्य म्हणजे लस घेतल्यानंतर शरीराला आराम देणं गरजेचं असतं. त्यामुळे लस घेतल्यानंतर काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजे. जाणून घेऊया या गोष्टी कोणत्या.
1. अमेरिकेतील आरोग्य संस्था सीडीसीच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर कमीत कमी 1 दिवस घरी राहून आराम केला पाहिजे. ज्यामुळे लसीतील औषधाला शरीरासोबत ताळमेळ करण्यास वेळ मिळेल. त्याचप्रमाणे लस घेतल्यानंतर जर त्याचे काही साईड इफेक्ट्स असतील तर ते 24 तासांच्या आत दिसून येतील.
2. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर तुम्हाला पुरेसं पाणी प्यायलं पाहिजे. लस घेतल्यानंतर तुम्हाला सौम्य प्रकारचा ताप येण्याची शक्यता आहे. यासाठीच पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. या शिवाय हल्के आणि घट्ट नसलेले कपडे परिधान करावेत.
3. लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर गर्दी असलेल्या ठिकाणी जाणं टाळावं. लस 100 टक्के सुरक्षा करू शकत नाही. लस घेतल्यानंतर देखील तुम्हाला इन्फेक्शनचा धोका असतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये आणि बाहेर गेल्यास मास्कचा वापर करावा
4. कोरोना लस घेतल्यानंतर कमीत कमी 2 दिवस वर्कआऊट करणं टाळलं पाहिजे. कारण लस घेतल्यानंतर तुम्हाला काही प्रमाणात अशक्तपणा जाणवू शकतो. अशावेळी वर्कआऊट करताना तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता असते.
5. सीडीसीच्या मार्गदर्शकतत्त्वांनुसार, कोरोना लस घेतल्यानंतर 2 ते 3 दिवस लांब पल्ल्याचा प्रवास करू नये.
6. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर जर तुम्हाला कोणतेही साईड इफेक्ट्स दिसले तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.