वॉशिंग्टन : असं म्हणतात लग्नाचे लाडू जो खातो तो पस्तावतो आणि जो खात नाही तोही पस्तावतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार अशी बाब समोर आलीये की ज्यामुळे लग्न केल्याचा पस्तावा होणार नाही. या संशोधनानुसार लग्न केल्याने तणाव कमी होतो. अधिक कमावणारे अविवाहित यांच्या तुलनेत जे लोक लग्न करतात आणि ज्याचे प्रतिवर्षाला इनकम ६० हजार अमेरिकन डॉलरपेक्षा कमी आहे त्यांच्यात तणावाची लक्षणे कमी दिसतात.
अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेट युनिर्व्हसिटीच्या संशोधकांनी यावर संशोधन केलेय. यात अमेरिकेतील २४ ते ८९ वर्षाच्या वयोगटातील ३,१६७ लोकांवर हा प्रयोग करण्यात आला.
या सर्वेक्षणात सामाजिक, मनोवैज्ञानिक, मानसिक आणि शारिरीक स्वास्थाचे विषय समाविष्ट होते. जॉर्जिया स्टेटचे सहाय्यक प्रोफेसर बेन लेनोक्स कॅल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे लोक विवाहित आहेत आणि जे वर्षाला ६० हजार अमेरिकन डॉलरपेक्षा कमी कमावतात त्यांच्यात तणावाची लक्षणे कमी दिसतात.
अनेकजण ताणतणाव दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषधे घेतात. मात्र ही औषधे शरीरासाठी घातक ठरु शकतात. यामुळे मृत्यूही ओढवू शकतो. संशोधनानुसार जे लोक अशा प्रकारची औषधे घेत नाही त्यांच्या तुलनेत औषधे घेणाऱ्यांच्या मृत्यूची शक्यता ३३ टक्के वाढते.