मुंबई : आजकाल अकाली केस पांढरे होण्याची समस्या सामान्य झाली आहे. पण केस पांढरे होणे सौंदर्याला मारक ठरते. मग त्यावर उपाय म्हणजे महागडे हेअर कलर्स वापरणे. काहीजण पार्लरमध्ये जावून हेअर कलर लावतात तर काहीजण पैसे वाचवण्यासाठी घरच्या घरी हेअर डाय करतात. पण यामुळे फक्त केस खराब होत नाहीत तर पैसेही वाया जातात. कारण हा हेअर कलर दीर्घकाळ टिकत नाही आणि वारंवार त्यासाठी खर्च करावा लागतो. त्याचबरोबर वेळ, पैसे वाया जाण्यामुळे होणारा मानसिक ताण वेगळाच. पण यावर एक सोपा घरगुती उपाय आहे. त्यामुळे पैसे वाया तर जाणार नाहीत. उलट केसांचे नुकसान टाळता येईल. आणि घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने पांढरे केस काळे होतील. तर जाणून घेऊया कोणता आहे तो उपाय...
केसांना काळे करण्यासाठी बटाट्याची साल उपयुक्त ठरते. यात असलेल्या स्टार्चमुळे केसांना नैसर्गिक रंग प्राप्त होतो. बटाट्याच्या सालीत व्हिटॉमिन ए, बी आणि सी असल्याने स्काल्फवरील जमलेले तेल दूर होऊन कोंड्याच्या समस्येला आळा बसतो. इतकंच नाही तर बटाट्यात असलेल्या आयर्न, झिंक, पोटॅशियम आणि कॅल्शियम यांसारख्या खनिजांमुळे केसगळती कमी होते.
सर्वप्रथम बटाट्याची साल काढा. त्यानंतर साल एक कप पाण्यात चांगल्या प्रकारे उकळवा. नीट उकळल्यानंतर ५-१० मिनिटे मंद आचेवर शिजवा. त्यानंतर हे मिश्रण काही वेळ थंड होऊ द्या. त्यानंतर ते पाणी एका भांड्यात काढून ठेवा. बटाट्याच्या पाण्याचा काहीसा वेगळा वास येतो. तो दूर करण्यासाठी त्यात काही थेंब लव्हेंडर ऑईल घाला.
हे मिश्रण स्वच्छ ओल्या केसांवर लावा. त्यामुळे जास्त फायदा होईल. बटाट्याच्या सालीच्या पाण्याने पाच मिनिटे स्काल्फला मसाज करा. त्यानंतर अर्धा तास ते मिश्रण केसांवर तसेच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवा.