कोरोनातून मुक्त झाल्यानंतर लस घेतलीत का? बघा काय होतील परिणाम

कोरोनामुक्त झाल्यानंतर काही दिवसांच्या अंतराने लस घेण्याचा सल्ला देण्यात येतो.

Updated: Jun 20, 2021, 10:11 AM IST
कोरोनातून मुक्त झाल्यानंतर लस घेतलीत का? बघा काय होतील परिणाम title=

मुंबई : देशात कोरोनाशी सामना करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेवर जोर देण्यात येत आहे. 18 वर्षापेक्षा अधिक वयाच्या सर्व लोकांना देशभरात लस देण्यात येतेय. मात्र अजून देखील ही लस घेण्याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर काही दिवसांच्या अंतराने लस घेण्याचा सल्ला देण्यात येतो.

अशा परिस्थितीत, कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर लस घेतल्यावर त्याच्या परिणामांबद्दल लोकांच्या मनात अनेक चिंता आहेत. दरम्यान तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोनातून मुक्त झाल्यानंतर लस घेतली तर त्याचा शरीरावर परिणाम होतो. परंतु घाबरून जाण्याची गरज नाही, कारण याचा सकारात्मक परिणाम पहायला मिळतो.

रॉकफेलर विद्यापीठाने केलेल्या संशोधनातून असं स्पष्ट झालंय की, कोरोनामधून बऱ्या होणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात एन्टीबॉडीज पुरेशा प्रमाणात तयार होतात. त्यानुसार त्याची प्रतिकारशक्ती खूप मजबूत राहते. एन्टीबॉडीज देखील शरीरात सुमारे एक वर्ष राहतात, परंतु या काळात ही लसदेखील घेतली तर फायदेशीर ठरू शकते.

दरम्यान यासंदर्भात माहिती देताना महाराष्ट्र मेडिकल काऊंसिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणाले, "कोरोनातून मुक्त झाल्यानंतर देखील लस ही घेतलीच पाहिजे. कोरोनावरील उपचारांदरम्यान शरीरात एन्टीबॉडीज तयार होतात. मात्र या एन्टीबॉडीज ठराविक काळासाठी असतात. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घ्यावेत जेणेकरून दीर्घकाळ एन्टीबॉडीज शरीरात राहतील."

कोरोनाच्या उपचारांदरम्यान शरीरात असलेल्या एन्टीबॉडीसमवेत जर ही लसदेखील घेतली तर यामुळे एन्टीबॉडीजची क्षमता आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

डॉ. उत्तुरे पुढे म्हणाले, "दरम्यान उपचारांदरम्यान शरीरात तयार झालेल्या एन्टीबॉडीज आणि लसीमार्फत मिळालेल्या एन्टीबॉडीज डेल्टा वेरिएंटच्या विरोधात किती प्रभावशाली ठरेल हे भारतात सुरु असलेल्या संशोधनानंतर समोर येईल."