नवी दिल्ली : इतिहासाच्या पानांमध्ये भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं नाव अजरामर आहे. त्यांचं नाव इतिहासातून काढणं अशक्य आहे अशा शब्दांत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इंदिरा गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला.
इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दिल्लीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माजी राष्ट्रपती प्रणवदांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनीही इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली. इंदिरा गांधी यांचा धर्मनिरपेक्षतेवर विश्वास होता आणि आयुष्यभर त्या कायम विचारांची लढाई लढल्याचं सोनिया गांधी यांनी यावेळी म्हटलंय. सामाजिक न्यायासाठी इंदिरा गांधी आग्रही होत्या असंही त्यांनी सांगितलं.
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि आयरन लेडी अशी ओळख असणा-या इंदिरा गांधी यांची आज शंभरावी जयंती. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी इंदिरा गांधी यांच्या शक्तीस्थळ या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. इंदिरा गांधी यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.
दृढ आत्मविश्वास आणि ठोस निर्णय घेण्याची क्षमता यामुळे इंदिरा गांधी लोकप्रिय नेत्या बनल्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनवण्याचा त्यांचा निर्णय देशाला प्रगतीपथावर नेणारा होता. इंदिरा गांधी यांनी आपले वडील पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यासह स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे योगदान दिलं.
१९५९ आणि १९६० मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या. १९६४ साली त्यांची राज्यसभा सदस्यपदी निवड झाली. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मंत्रीमंडळात त्या माहिती आणि प्रसारण मंत्रीपद भुषवलं.
लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या पदाच्या लढाईवेळी त्यांना मोरारजी देसाई यांच्याशी सामाना करावा लागला. ३५५ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या १९६६ मध्ये देशाच्या त्या पाचव्या पंतप्रधान बनल्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख झाली.