नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे देशात उद्योग, व्यवसाय, वाहतून सर्व काही बंद आहे. उद्योग बंद असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांच उत्पन्न देखील बंद झालं. त्यामुळे कामगारांनी त्यांचा मोर्चा आपल्या गावाकडे वळवला. कोणतीही वाहतूक सेवा उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी पायी आपलं गाव गाठण्याचा निर्णय घेतला आणि ते गावाकडे निघाले. परंतु या पायी प्रवासात एका १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. घरी पोहोचण्यासाठी फक्त एक तास बाकी असताना या मुलीने आपले प्राण सोडले. तेलंगण येथून छत्तीसगडमधील बिजापूर येथे निघालेल्या या चिमुरडीने तीन दिवसांत तब्बल १५० किमीचं अतंर चालत कापलं होतं.
जामलो मकदम असं या १२ वर्षाच्या मुलीचं मुलीचं नाव आहे. कुटुबाचं पोट भरण्यासाठी ती मिरचीच्या शेतात मिरच्या तोडण्याचे काम करत होती. पण लॉकडाऊनमुळे तिचे काम बंद झाले होते. त्यामुळे १५ एप्रिल रोजी तिने पायी प्रवास सुरू केला होता. तिच्यासोबत शेतात काम करणारे इतर ११ जण देखील होते. तीन दिवसांत १५० किमी अंतर पार केल्यानंतर घरी पोहोचण्यासाठी फक्त एक तास बाकी होता.
पण अचानक तिच्या प्रचंड पोटात दुखू लागल्यामुळे ती जागीच पायी कोसळली आणि जागीच मृत्यू झाला. अखेर रुग्णवाहिकेच्या मदतीने तिचा मृतदेह घरी नेण्यात आला. डिहायड्रेशन आणि भुकेपोटी तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यानंतर तिच्यासोबत असणाऱ्या १२ व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे.