नवी दिल्ली - १९८४ मधील शिखविरोधी दंगली प्रकरणातील आरोपी आणि काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दिल्ली हायकोर्टाने सोमवारी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कनिष्ठ कोर्टाने दिलेला निकाल रद्दबातल ठरवत न्यायालयाने या प्रकरणात सज्जन कुमार दोषी असल्याचा निकाल दिला. यामुळे त्यांना मोठा झटका बसला आहे. न्या. एस मुरलीधर आणि न्या. विनोद गोयल यांच्या खंडपीठाने २९ ऑक्टोबर रोजी या प्रकरणातील निकाल राखून ठेवला होता.
शिखविरोधी दंगलींप्रकरणी कोर्टाने सीबीआय, दंगलींमधील पीडित आणि दोषी ठरविण्यात आलेल्या व्यक्तींनी केलेल्या याचिकांवरील सुनावणी ऑक्टोबरमध्ये पूर्ण केली होती. सर्व बाजू ऐकून घेतल्यावर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शिख समुदायाविरोधात दंगे उसळले होते. त्यावेळी काँग्रेस नेते बलवान खोखर, नौसेना अधिकारी कॅप्टन भागमल, गिरधारी लाल आणि अन्य दोन व्यक्तींनी दिल्लीतील राजनगर क्षेत्रामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या केल्याचा आरोप होता. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सज्जन कुमार यांना निर्दोष ठरवले होते. पण खोखर, भागमल आणि गिरधारी लाल यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
महेंद्र यादव आणि किशन खोखर यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपींनी मे २०१३ मध्ये कनिष्ठ न्यायालयातील निर्णयाला आव्हान दिले होते. त्याचवेळी सीबीआयने पण या प्रकरणात वरिष्ठ कोर्टात याचिका दाखल केली होती. आरोपी हे पूर्वनियोजित धार्मिक दंगे घडवून आणण्यात सहभागी होते, असा आरोप सीबीआयने केला होता. अखेर सोमवारी दिल्ली हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवला. त्याचबरोबर या प्रकरणातील प्रमुख आरोप आणि काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवले.