Mudra Loan : आता 10 नाही, 20 लाख रुपयांपर्यंतचं मिळेल कर्ज! असा करा अर्ज

PM Mudra Yojana: आज देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी सरकारने कोणत्या मोठ्या घोषणा केल्या याचा आढावा

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 23, 2024, 12:16 PM IST
Mudra Loan : आता 10 नाही, 20 लाख रुपयांपर्यंतचं मिळेल कर्ज! असा करा अर्ज title=
Union Budget 2024 Loans limit under PM Mudra Yojana enhanced to ₹20 lakhs

PM Mudra Yojana: मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज संसदेत मांडण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सलग सातव्यांदा अर्थसंकल्प मांडला. यंदाही सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. रोजगार, शेती, त्याचबरोबर उद्योग याक्षेत्रांसाठी घोषणा जाहीर केल्या आहेत. मुद्रा योजनेच्या मर्यादेत वाढ केली आहे. त्यामुळं आता सर्वसामान्यांना आता अधिक किमतीचे कर्ज मिळणार आहे. 

निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचे वाचन करताना मुद्रा योजनेबाबतही महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ज्या लोकांनी याआधीच कर्ज घेतलं आहे आणि वेळेतच कर्जाची परतफेड केली आहे. त्यांच्यासाठी मुद्रा योजनेची मर्यादा 10 लाख रुपयांनी वाढवून 20 लाखापर्यंत करण्यात येणार आहे. मुद्रा योजना काय आहे? आणि त्यासाठी फॉर्म कसा करावा, हे जाणून घेऊया. 

पंतप्रधान मुद्रा योजना ही सरकारने 2015 साली सुरू केली होती. सर्वसामान्यांना एखादा रोजगार करायचा असेल त्यासाठी कर्जाची आवश्यकता असल्यास सरकारच्या या योजनेतून तुम्हाला 10 लाखापर्यंतचे कर्ज मिळत होते. मात्र, 2024च्या अर्थसंकल्पात आता कर्जाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आता मुद्रा योजनेंतर्गंत 20 लाखापर्यंतचे कर्ज मिळणार आहे. 

मुद्रा योजनेचे फायदे काय?

बँकेतून किंवा पतपेढीतून कर्ज घ्यायचे झाले तर सोनं किंवा घर तारण ठेवावे लागत होते. मात्र, मुद्रा योजनेंतर्गंत विना गँरटी कर्ज मिळते. त्याचसोबत कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. कर्ज परतफेडीचा कालावधी पाच वर्षांपर्यंत वाढवला देखील जाऊ शकतो. 

तीन टप्प्यांत मिळू शकते कर्ज?

मुद्रा योजनेंतर्गंत तीन श्रेणींमध्ये कर्ज दिले जाते. पहिल्या श्रेणीत शिशु कर्ज या अतर्गंत 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. किशोर लोन या  प्रकारात 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. तर, तिसऱ्या टप्प्यात 5 ते 10 लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते. 

मुद्रा योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो?

मुद्रा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज द्यावा लागणार आहे. तुम्ही तुमच्या नावाने उद्योग सुरू करणार असाल तर तुम्हाला घराचा मालकी हक्क, भाड्याच्या घराचे करारपत्र, कामासंबंधित माहिती, आधार कार्ड, पॅन कार्डसह अन्य कागदपत्र सादर करावी लागतात. तुमच्या उद्योगासंबंधी माहिती घेऊन तुम्हाला लोन मंजूर केले जाणार आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्ही या योजनेची अधिकृत वेबसाइट http://www.mudra.org.in/ ला भेट देऊ शकता.