श्रीनगर : काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये सेनेतील दोन जवानांचाही समावेश आहे. घाटीमध्ये चारही बाजूंना बर्फाची सफेद चादर पसरली आहे. एक ते चार फुटांपर्यंत बर्फ जमा झाला आहे. काश्मीरला, देशाशी जोडणारे सर्व राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नॉर्थ काश्मीरमधील लंगेट भागात जवानांची गाडी दुर्घटनाग्रस्त झाली. ज्यात एक रायफलमॅन आणि एका जवानाचा मृत्यू झाला. दृश्यमानता कमी झाल्यामुळे अपघात झाल्याची माहिती सेनेकडून देण्यात आली आहे.
बर्फवृष्टीमुळे कुपवाडामध्ये एलओसी भागात हिमस्खलन झाल्याने दोन स्थानिकांना मृत्यू झाला. पुलवामामध्येही, एका स्थानिकाचा मृत्यू झाला. तर राजधानी श्रीनगरमध्ये विद्युत विभागातील कर्मचाऱ्याचा काम करताना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनेक भागात बर्फवृष्टीमुळे वीजपुरवठाही खंडित झाला आहे.
Rajouri in Jammu and Kashmir receives snowfall. pic.twitter.com/Ql1S2axpRf
— ANI (@ANI) November 8, 2019
या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व जिल्ह्यांत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. विद्युत, पाणी आणि रस्त्यांची परिस्थिती सुरळीत राहण्यासाठी व्यवस्था केली जात आहे. जनतेला कोणत्याही त्रास होऊ नये यासाठी पाणी आणि इतर आवश्यक वस्तूंचा साठादेखील करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
हवामान खात्याचे उपसंचालक मुख्तार यांनी सांगितलं की, ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये हिमवर्षाव आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याचे प्रशासनाला कळविण्यात आलं आहे. त्यामुळे वाहतुकीवरही याचा परिणाम होऊ शकतो. जम्मू-काश्मीर, लडाखसह मुगल राजमार्ग बंद होण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं.