राजस्थानच्या भरतपूर येथे एका पती दारोदारी जाऊन मदत मागण्याची वेळ आली आहे. एका अपघातात त्याला आपले दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. यामुळे पतीवर व्हिलचेअरवर बसण्याची वेळ आली असून, आता तो हतबल झाला आहे. दरम्यान, अशा स्थितीत आपल्या पतीची खंबीर साथ देत पाठीशी उभं राहण्याऐवजी पत्नीने त्याची साथ सोडली आहे. पत्नी आता आपल्या अपंग पतीसह राहण्यास तयार नाही. अखेर पीडित पतीने न्याय मिळवण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडे मदत मागितली आहे.
भरतपूरच्या पांडला गावातील हे प्रकरण आहे. येथे राहणारे उन्नस हे ट्रक ड्रायव्हर होते. ट्रक चालवत ते आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत होते. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये ट्रक नेत असल्याने ते फार दिवस घऱापासून लांबच असायचे. पण जेव्हा कधी घरी येत असते तेव्हा ते सगळी कमाई पत्नीच्या हाती सोपवत असत. घर बांधण्यासाठी त्यांनी एक जमीनही खरेदी केली होती. ही जमीन त्यांनी पत्नीच्याच नावे खरेदी केली होती. पण चार वर्षांपूर्वी झालेल्या एका रस्ते अपघातात उन्नस यांचं पूर्ण आयुष्यच बदललं. त्यांचे दोन्ही पाय कापावे लागले. यानंत उन्नस कित्येक वर्षं बेडवरच होते. त्यात आता त्यांची पत्नीने सोबत राहण्यास नकार दिला आहे.
उन्नस यांच्यावर आता व्हिलचेअरवर बसून फिरण्याची वेळ आली आहे. उन्नस व्हिलचेअरवर बसूनच प्रशासन आणि पोलिसांकडे न्याय मागत आहेत. उन्नस यांनी नौगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पण पोलीस त्यांची काही मदत करु शकले नाहीत. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना आपबीती सांगितली.
उन्नस यांनी सांगितलं की, कोटाकला गावात राहणाऱ्या जाहिदाशी 25 वर्षांपूर्वी माझं लग्न झालं होतं. जाहिदा आधीच एका मुलीची आई होती. पण यानंतरही त्यांनी लग्न केलं आणि एकत्र राहू लागले. 2017 मध्ये झालेल्या एका अपघातात त्यांचे दोन्ही पाय गेले. आता त्यांची पत्नी आणि मुलांनी धक्के देऊन बाहेर काढलं.
उन्नस यांनी सांगितलं आहे की, अपघातानंतर आपल्याला क्लेमचे 14 लाख रुपये मिळाले होते. पण पत्नीने हे सर्व पैसे हडपले. तसंच भावासह मिळून जमीनही विकून टाकली. आपण 10 दिवसांपूर्वी नौगांवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण आतापर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.