बिहारच्या समस्तीपूरमधील एक अजब घटना समोर आली आहे. एक तरुण आपल्या वडिलांची खाकी वर्दी घालत पोलीस असल्याचा बनाव करत होता. विशेष म्हणजे तो आपल्या वडिलांच्या जागीच नोकरी करत होती. तरुणाचे वडील कॉन्स्टेबल असून, अत्यंत शिताफीने तो पोलीस खात्याला चकवा देत होता. इतकंच नाही तर पोलीस अधिकाऱ्यांसमोरही तरुण रुबाबात उपस्थिती लावत असे. पण कोणालाही त्याच्यावर साधा संशयही आला नाही.
मऊ धनेशपुर दक्षिण पंचायतचे कॉन्स्टेबल जीवछ पासवान यांच्या जागी त्यांचा मुलगा संजीत गेल्या एक वर्षापासून नोकरी करत होता. एखाद्या प्रकरणाचा तपास असो किंवा मग कैद्यांना जेलमध्ये न्यायचं असो, प्रत्येक ठिकाणी जीवछ यांच्या जागी त्यांचा मुलगा हजेरी लावत होता. दुसरीकडे वडील आपलं कर्तव्य निभावण्याऐवजी घरीच आराम करत होते.
संजीत वर्दीतील आपले फोटो आणि व्हिडीओ नेहमी सोशल मीडियावर शेअर करत होता. त्यातच कोणीतरी पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. यानंतर डीएसपींनी या प्रकरणी तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
संजीत पासवान वडिलांच्या खाकी वर्दीत पोलीस ठाण्यात पोहोचत असे आणि वडिलांच्या नावे देण्यात आलेल्या कामांची माहिती घेत असे. संजीत पोलीस अधिकाऱ्यांची महत्त्वाची पत्रंही पोहोचवत होता. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, अधिकाऱ्यांसमोर तो पोलीस वर्दीत वावरत असे पण एकालाही त्याचा संशय आला नाही.
संजीत पोलीस अधिकाऱ्यांसह फ्लॅग मार्च आणि ड्युटीवरही जात असे. तपासासाठी जाणारे पोलीस त्याला आपल्या सोबत घेऊन जात असतं. संजीत फक्त पोलीस ठाण्यात बसत नव्हता, तर गोपनीय नोटीस घेऊन गावातही जात असे.
संजीत तपास करणारे पोलीस कर्मचारी आणि आरोपी यांच्यातील मध्यस्थीचं काम करत असे अशी सूत्रांची माहिती आहे. या माध्यमातून तो पैसे कमवत असे.
लोकांचा दावा आहे की, संजीतचे वडील जीवछ पासवान आजारी असतं. त्यामुळे ते मुलाला पोलीस ठाण्यात कर्तव्य पूर्ण करण्यासाठी पाठवत होते. पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांना याची माहिती होती. पण यानंतरही ते त्याला तपासासाठी सोबत नेत असतं. याप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
दलसिंहसरारयचे डीएसपी दिनेश पांडेय यांनी सांगितलं आहे की, याप्रकरणी माझ्याकडे पूर्ण माहिती उपलब्ध नाही. हे गंभीर प्रकरण आहे. सेवेत नसताना कोणीही पोलिसांची वर्दी घालू शकत नाही. या प्रकरणी चौकशी केली जाईल. दोषींना सोडलं जाणार नाही.