उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. घऱातील बाथरुममध्ये महिलेने गळफास घेत टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान, आत्महत्या करण्याआधी महिलेने बाथरुमच्या भिंतीवर एक संदेश लिहिला होता. यात तिने म्हटलं होतं की, 'I love you मम्मी-पापा, माझ्या पतीला काही करु नका'. दरम्यान, मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच तिच्या वडिलांनी सासरच्यांविरोधात हुंडा आणि हत्येचा आरोप करत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी पतीसह 5 जणांना ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाराबंकी येथे राहणाऱ्या मोनिका वर्माचं लखनऊच्या गुंडबा येथे राहणाऱ्या अभिषेक वर्माशी लग्न झालं होतं. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मोनिका बाथरुममध्ये गेली होती. पण बराच वेळ झाला तरी मोनिका बाहेर येत नसल्याने कुटुंब चिंतेत पडलं. त्यांनी बाथरुमचा दरवाजा ठोठावला पण आतून मोनिकाने काहीच उत्तर दिलं नाही. यानंतर अखेर सासरच्यांनी बाथरुमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी त्यांनी पाहिलं असता मोनिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता. यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले होते. त्यांनी मृतदेह खाली उतरवला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यावेळी बाथरुमच्या भिंतीवर मोनिकाने लिहिलेला तो संदेशही पोलिसांनी वाचला. ज्यामध्ये लिहिलं होतं की, आय लव्ह यू मम्मी-पप्पा, पती अभिषेकला काही बोलू नका.
यानंतर पोलिसांनी मोनिकाच्या आई-वडिलांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोहोचलेल्या नातेवाईकांनी मोनिकाच्या घराबाहेर गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
कुटुंबीयांचा आरोप आहे की, मुलगी दोन्ही जाव तिथेच राहत होत्या. याशिवाय पुतण्या यथार्थ आणि मामा सुमित सिंग हेही तिथे राहतात. हे सर्वजण मिळून त्यांच्या मुलीचा हुंड्यासाठी छळ करत होते. लग्नाच्या वेळी आम्ही 15 लाख रुपये खर्च केले होते आणि आता ते आणखी पैशांची मागणी करत होते. त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने त्यांनी मुलीची हत्या करून मृतदेह लटकवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मकटाचा एक भाग म्हणून भिंतीवर संदेश लिहिल्याचा त्यांचा दावा आहे.
यानंतर महिलेच्या माहेरच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या पतीसह आठ जणांविरुद्ध हुंडा आणि हत्येप्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे.