नवी दिल्ली : या वर्षातील (२०१७) हिंदी शब्द म्हणून 'आधार' म्हणून निवड केली आहे. ऑक्सफर्ड प्रतिवर्षी एका इंग्रजी शब्दाची वर्षातील शब्द म्हणून निवड करते. यंदा प्रथमच हिंदी शब्दाची निवड करण्यात आली. यात 'आधार' या शब्दाने बाजी मारली आहे.
जयपूर येथे सुरू असलेल्या साहित्योत्सवात (जेएलएफ) 'आधार'ला शनिवारी हा बहूमान मिळाला. या महोत्सवात कवी अशोक वाजपेयी, ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ आणि ज्येष्ठ साहित्यीका चित्रा मुदगल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ऑक्सफर्ड डिक्शनरीकडून आलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, निवड समितीसमोर 'आधार'सोबतच अनेक हिंदी शब्दांचा पर्याय होता. यात नोटबंदी, स्वच्छ, योग, विकास आणि बाहुबली यांसारख्या शब्दांचा सहभाग होता. मात्र, निवडसमितीने 'आधार'वर मोहर उमठवली. ऑक्सफर्डने म्हटले आहे की, या वर्षातील हिंदी शब्द, ही एक असा अविष्कार आहे की, ज्या शब्दाने लोकांचे सर्वाधीत लक्ष वेधून घेतले. तसेच हा शब्द गेल्या वर्षातील समाज, संस्कृती आणि लोकांच्या मनावर आणि दैनंदिन जीवनावरही प्रभाव टाकून होता.
हिंदी भाषेत 'आधार' हा अत्यंत मौल्यवान शब्द बनला आहे. आधार कार्डवरील विशिष्ट ओळख क्रमांकामुळे या शब्दाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे हा शब्द गेल्या वर्षी प्रचंड चर्चेत होता. या शब्दाचा प्रभाव यंदाही पहायला मिळत आहे. सर्व प्रकारची ओळख दर्शवण्याची ठिकाणे, शाळा, महाविद्यालये, तसेच सरकारी उपक्रम, योजना आदिंचा लाभ आणि कामाच्या ठिकाणी हा शब्द प्रामुख्यने वापरला जातो.