आसामच्या गुवाहाटीत अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून एक व्यक्ती आपल्या आईच्या सांगाड्यासोबत राहात होता. सांगाड्याची दररोज पुजा करण्याबरोबरच आपल्या हाताने तिला जेवण भरवण्याचाही प्रयत्न करायचा. धक्कादायक म्हणजे या व्यक्तीने स्वत:ला एका खोलीत बंद करुन घेतलं होतं. घराच्या बाहेर तो कुठेही जात नव्हता आणि बाहेरच्या व्यक्तीला घरात येऊ देत नव्हता. त्यामुळे या घरात काय सुरु आहे याचा शेजाऱ्यांनाही अंदाज आला नाही.
मृतेदहाचा सांगाडा बनला होता. घरातून उग्र वास येऊ लागल्याने शेजारच्यांनी त्या व्यक्तीला काय घडलंय हे विचारण्याचा प्रयत्न केला. तसंच त्याची आई बरेच दिवस दिसली नसल्याचंही विचारलं. पण त्या व्यक्तीने या प्रश्नांचं कोणतंच उत्तर दिलं नाही. त्यामुळे शेजारच्यांना संशय येऊ लागला. अखेर काही शेजाऱ्यांनी एकत्र येत त्या व्यक्तीच्या घरी धडक दिली आणि तुझी आई कुठे आहे अशी विचारणा केली. अचानक बरीच लोकं आलेली पाहून तो व्यक्ती घाबरला आणि त्याने आईचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.
हे ऐकताच शेजारच्यांना धक्का बसला. त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. आईचा मृतदेह झाल्याचं कोणाला कळवलं का नाही? मृतदेहावर अंत्यसंस्कार का केले नाहीत? पण यातल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर या व्यक्तीने दिलं नाही, तसंच दरवाजाही बंद करुन घेतला. काहीतरी विपरीत घडत असल्याचा संशय शेजारच्यांना होता, म्हणून त्यांनी घराच्या खिडकीतून डोकावून पाहिलं, त्यावेळी त्यांना धक्काच बसला. तो व्यक्ती सांगड्याला जेवण भरवण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांना दिसलं.
शेजारच्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ज्यावेळी त्या व्यक्तीचा पोलिसांनी रुम उघडला त्यावेळी आतमध्ये त्यांना एक सांगाडा दिसला. तो सांगाडा त्या व्यक्तीच्या आईचाच असल्याचं त्यांना कळलं. पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेत त्या व्यक्तीलाही अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आईच्या मृत्यूचा त्या व्यक्तीला जबर धक्का बसला होता. आणि यातच त्याची मानसिक अवस्था ढासळली.
पतीच्या पेन्शवर चालत होतं घर
गुवाहाटीतल्या रॉबिन्सन स्ट्रीटवरची ही घटना आहे. मृत महिलेचं नाव पूर्णिमा देवी असं होतं, ती आपल्या 40 वर्षांचा मुलाग जयदीप बरोबर राहात होती. पतीच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या पैशांवर त्यांचं घर चालत होतं. आई आणि मुलगा शेजाऱ्यांशी फारसे बोलायचे नाहीत. दोघंही घरात बंद असायचे. पण काही दिवसांपासून पूर्णिमा देवी दिसत नसल्याने शेजारच्यांना संशय आला. त्यांच्या घरातूनही उग्र वास येत होता. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
म्हणून सांगाड्याची पूजा करायचा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयदीपला आपली आई पुन्हा जिवंत होईल असं वाटत होतं. त्यामुळे तो नेहमी आईच्या सांगाड्याची पूजा करायचा, तसंच सांगाड्या जेवण भरवण्याचा प्रयत्न करायचा. या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबात पोलीस आता अधिक माहिती गोळा करत आहेत.