चेन्नई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेपाठोपाठ आणखी एका मित्रपक्षाशी युती करण्यात यश मिळवले आहे. अण्णाद्रमुक आणि भाजपने मंगळवारी तामिळनाडू व पुद्दुचेरीमध्ये लोकसभा निवडणूक एकत्रितरित्या लढवणार असल्याचे जाहीर केले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी आणि अण्णाद्रमुकचे नेते ओ. पनीरसेल्वम यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ही घोषणा केली. त्यानुसार भाजप तामिळनाडूतील महाआघाडीचा भाग म्हणून निवडणूक लढवले. तामिळनाडूत लोकसभेच्या एकूण ३९ जागा असून त्यापैकी पाच जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. तर पुद्दुचेरीत भाजप लोकसभेच्या एका जागेवर निवडणूक लढवेल.
शिवसेना-भाजपचे मनोमीलन; लोकसभेला २३-२५, विधानसभेला ५०-५० चा फॉर्म्युला
याशिवाय, तामिळनाडूतील २१ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजप अण्णाद्रमुकच्या उमेदवारांना पाठिंबा देईल. त्यामुळे लोकसभा निवडणूक मोदींच्या नेतृत्त्वाखाली आणि विधानसभा निवडणूक ओ. पनीरसेल्वम व ई. पलानीस्वामी यांच्या नेतृत्त्वाखाली लढवण्याचा निर्णय अण्णाद्रमुकने घेतल्याची माहिती, पीयूष गोयल यांनी दिली. तर अण्णाद्रमुक आणि भाजपा यांची ही आघाडी विजयी ठरेल, असा विश्वास तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी व्यक्त केला.
भाजपला धक्का, नारायण राणेंचा पक्ष स्वबळावर लढणार
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आतापर्यंत अनेकदा दक्षिणेकडील राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नांना म्हणावे तितके यश आलेले नाही. त्यामुळे आता भाजपने सत्ताधारी अण्णाद्रमुकसोबत मोट बांधल्याची चर्चा आहे.