आगरतळा : त्रिपुरामधील भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले बिप्लब देव हे आता वादग्रस्त विधानाने अधिक चर्चेत आलेत. आधी महाभारताबाबत विधान केले होते. आता माजी मिस वर्ल्ड डायना हेडनबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेय. तिला मिळालेल्या मुकुट हा फिक्स होता, असे विधान करुन वाद ओढवून घेतलाय. मात्र, ऐश्वर्या राय-बच्चन हिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय.
आगरतळा येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळलीत. मोदी देशातल्या डिजिटायझेशनला प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळेच देशातील प्रत्येक व्यक्ती इंटरनेटच्या माध्यमातून जोडली गेली आहे, असे ते म्हणालेत.
दरम्यान, देशात जुन्या काळापासून इंटरनेटचा वापर केला जातोय. महाभारताच्या काळात संजय दृष्टिहीन होता. परंतु युद्धाची सर्व माहिती तो धृतराष्ट्रांना ऐकवत होता. यासाठी त्याने इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीचा आधार घेतला होता, असे धक्कादायक विधान केले होते. त्यामुळे देव यांनी महाभारत काळातील इंटरनेटवरून केलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेली चर्चा थांबत नाही तोच त्यांनी माजी मिस वर्ल्ड डायना हेडनवर वादग्रस्त विधान करुन नवा वाद ओढवून घेतलाय.
डायनाला २१ वर्षांपूर्वी देण्यात आलेल्या मिस वर्ल्डच्या विजेतेपदावर बिप्लब देव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेय. ही सौंदर्य स्पर्धा बोगस होती. तिला देण्यात आलेला मुकुट हा 'फिक्स' होता. मात्र ऐश्वर्या राय हिच्या सौंदर्याचे देव यांनी कौतुक केलेय. ऐश्वर्या खऱ्या अर्थाने भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करते, असे त्यांनी म्हटलेय. आम्ही भारतीय महिलांना लक्ष्मी, सरस्वतीच्या रूपात पाहतो. ऐश्वर्या राय भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करते. डायना मिस वर्ल्ड बनली, हे ठीक आहे, पण डायना हेडनचे सौंदर्य मला समजलेले नाही, असे धक्कादायक विधान केलेय.