नवी दिल्ली : फिर एक बार मोदी सरकार, ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी रक्ताचं पाणी करणारे अमित शाह हे या निकालाचे खरे शिल्पकार... निवडणुका जिंकण्याचा हातखंडा त्यांना अवगत आहे, हे या निकालांनी पुन्हा सिद्ध केलंय. परवाच्या पत्रकार परिषदेत 'कमसे कम तीनसो सीटें तो आएगी' असं म्हणताना अमित शहांच्या चेहऱ्यावर दिसणारा जबरदस्त आत्मविश्वास कालच्या निकालात सत्यात उतरताना दिसला. सध्याच्या घडीला देशातला हा क्रमांक दोनचा सामर्थ्यशाली नेता...
काळाची पावलं अमित शाहांना खूपच आधी कळतात. उत्तर प्रदेशातल्या महागठबंधनचा अंदाज येताच, अमित शाहांनी सगळं सैन्य आणि लक्ष वळवलं ते बंगालमध्ये... उत्तर प्रदेशची भरपाई पूर्व भारतातून करण्याची तयारी अमित शाहांनी केली. जो जिंकून येईल, त्याला उमेदवारी एवढं साधं सोपं गणित या चाणक्याचं असतं... बेरजेच्या राजकारणात अमित शाह यांचा हात कुणीच धरू शकत नाही. कधी कुणाला आणि कसं कुरवाळायचं याचंही उत्तम ज्ञान अमित शाह यांना आहे. म्हणूनच जयपूरमधला भाजपाचा कार्यक्रम सोडून अमित शाह मातोश्रीवर दाखल झाले, स्वतःच्याच गाडीतून उद्धवना घेऊन गेले, मिठी मारली आणि युती झालीसुद्धा...
बूथ व्यवस्थापन, रात्री अपरात्रीपर्यंत बैठका, प्रत्येक मतदारसंघात ठरवून कार्यक्रम, माध्यमांमधलं पक्षाचं वार्तांकन, संपर्कावर भर, अत्याधुनिक प्रचार ही टिपिकल अमित शाहांची स्टाईल... या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे फिर एक बार मोदी सरकार... २०१९ मध्ये मोदींना पुन्हा राज्याभिषेक झाला, तो या चाणक्यामुळेच...
सध्या अमित शाह पक्षाध्यक्ष आहेत. पुढच्या काळात ते सरकारमध्ये गृहमंत्रीपदासारखं महत्त्वाचं पद भूषवतील, असा अंदाज आहे. सध्या देश मोदींच्या जल्लोषात मग्न आहे... या क्षणी अमित शाह कदाचित २०२४ च्या तयारीलाही लागले असतील.