नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पंजाब नॅशनल बॅंक (PNB) च्या काही शाखा मर्ज करण्यात आल्या आणि काही एटीएम बंद झाले. मात्र आता अजून एका बॅंकेबाबतीत मोठी बातमी हाती येत आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बॅंकांपैकी एक बॅंक ऑफ इंडिया (BOI) खर्च कमी करण्यासाठी सुमारे ७०० एटीएम बंद करत आहे. याशिवाय बॅंक ३०० अन्य एटीएम बंद करण्याचा विचार करत आहे. मात्र यामुळे बॅंक ऑफ इंडियाच्या खाते दारांना त्रास होऊ शकतो.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०१८ पर्यंत एटीएम बंद करण्याचा निर्णय अमलात आणला जाईल. मीडिया रिपोर्टनुसार, हा निर्णय घेण्यापूर्वी बॅंक ग्राहकांच्या गरजांचा आणि आवश्यकतांचा विचार करत आहे. यापूर्वी एप्रिल २०१७ मध्ये बॅंकेने ९० एटीएम बंद केले आहेत.
एनपीए कमी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंकेने बॅंक ऑफ इंडियासाठी सुधारात्मक कारवाई सुरू केली आहे. गेल्या रिपोर्टनुसार, सप्टेंबर २०१७ च्या अखेरपर्यंत बॅंक ऑफ इंडियाचे एनपीए वाढवून १२.६२% करण्यात आले आणि नेट एनपीए ६.४७% केले. ही स्थिती बॅंकेसाठी चिंताजनक आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बॅंक ऑफ इंडियाचे देशभरात ७,८०७ एटीएम होते. एप्रिल २०१७ मध्ये ही संख्या कमी करून ७,७१७ करण्यात आली. बॅंक ऑफ इंडियाचे प्रबंध निर्देशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीनबंधु महापात्रा यांनी सांगितले की बॅंक खूप पूर्वीपासूनच या प्रकारच्या योजनेवर काम करत होती.