Crime News Mother Stabbed Daughter: मुलांवर अभ्यासाचा तणाव येणार नाही याची काळजी घ्या, असं पालकांना अनेकदा सांगितलं जातं. मात्र अनेकदा पालकांकडून त्यांच्या पाल्यावर दबाव टाकला जातोच. याच अभ्यासाच्या तणावावरुन कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका महिलेने तिच्या मुलीची हत्या केली आहे. मुलीला मिळालेल्या कमी मार्कांवरुन आईने मुलीला मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला. तर तिच्या आईला बंगळुरुमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये बाणशंकरी पोलीस स्टेशनचे अधिकारी चौकशी करत असून प्राथमिक चौकशीमध्ये मुलगी परिक्षेमध्ये 5 विषयांमध्ये नापास झाल्याच्या मुद्द्यावरुन आईने तिला मारहाण करण्यास सुरुवात केल्याचं समोर आलं आहे.
सोमवारी, बंगळुरुमधील शास्त्रीनगर परिसरामध्ये पद्मजा नावाच्या 60 वर्षीय महिलेने तिच्या साहित्या नावाच्या 19 वर्षीय मुलीला भोसकलं. या दोघींमध्ये परीक्षेतील मार्कांवरुन तुफान वाद झाल्याचं द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. साहित्याला अभ्यासामध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या. यावरुनच अनेकदा या दोघींमध्ये वाद व्हायचे. पद्मजा यांच्या पतीचं निधन झालं आहे. मुलगी साहित्याला शिकता यावं यासाठी पद्मजा यांनी त्यांच्या मालकीच्या कंपन्याही विकल्या होत्या. साहित्या अभ्यासामध्ये फार यश मिळवले अशी अपेक्षा पद्मजाला होती.
साहित्या आणि पद्मजामध्ये अभ्यासावरुनच वाद झाला आणि या वादातच दोघींनी एकमेकांवर चाकूने हल्ला केला. दोघींनाही गंभीर जखमा झाल्या. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या साहित्याचा मृत्यू झाला. तर पद्मजाच्या लिव्हरला गंभीर इजा झाली आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून तिला अतीदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. पोलिसांनी प्राण बचावलेल्या पद्मजाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आयसीयूमधून बाहेर आल्यानंतर पद्मजाची सविस्तर चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे.
17 मार्च रोजीही एका 24 वर्षीय महिलेने तिच्या 2 वर्षीय मुलीची हत्या केली. त्यानंतर तिने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. घरगुती हिंसा आणि आरोग्यासंदर्भातील समस्यांनी ती ग्रासलेली होती. के. आर. पुरम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिंगीहल्ली येथे हा अपघात घडला. या प्रकरणात मरण पावलेल्या मुलीचं ना श्रृतिका असं होतं. तिच्या वडिलांचं नाव लक्ष्मीनारायण असं असून आरोपी आईचं नाव चिन्ना असं आहे. वडील मंदिरामध्ये गेले असताना चिन्नाने मुलीची गळा आवळून हत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी चिन्नाने आईला फोन केला. तिच्या आईने जावयाला फोन करुन माहिती दिली. त्याने घराचं दार तोडून घरात प्रवेश केला तर मुलगी मृतावस्थेत पडल्याचं आणि पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं आढळून आलं. यासंदर्भात वडिलांनीच तक्रार दाखल केली आहे.