भोपाळ : तुमच्याकडे स्मार्टफोन आणि व्हॉट्सअॅप आहे तर मग ही बातमी नक्की वाचा.
सध्याच्या काळात प्रत्येकाकडेच स्मार्टफोन आणि व्हॉट्सअॅप असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, व्हॉट्सअॅपवर काहीजण असे काही मेसेजेस पाठवतात की ज्यामुळे समाजात तणाव निर्माण होतो. अशाच प्रकारे आक्षेपार्ह मेसेज पाठविणं एका व्यक्तीला चांगलचं महागात पडलं आहे.
मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये व्हॉट्सअॅपवर प्रक्षोभक मेसेज पाठविणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. जहांगीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी प्रितम सिंह ठाकुर यांनी सांगितले की, एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर सलमान नावाच्या व्यक्तीने प्रक्षोभक मेसेज पाठवला होता. त्यासंदर्भात ग्रुपच्या अॅडमिनने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हॉट्सअॅपवर पाठविण्यात आलेला मेसेजच्या आधारे आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.