नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचणीचे ( एक्झिट पोल) अंदाज समोर आल्यानंतर आता दिल्लीत भाजपनेही हालचाली करायला सुरुवात केली आहे. सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर रविवारी विविध संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले होते. यापैकी बहुतांश एक्झिट पोलनी मोदी सरकार पुन्हा सत्तेत येईल, असे स्पष्ट संकेत दिले होते.
त्यामुळे भाजपच्या गोटात कालपासून आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. तसेच अमित शहांकडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील ( रालोआ) नेत्यांना मंगळवारी दिल्लीत भोजनासाठी येण्याचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे भाजपकडून आता सत्तस्थापनेच्या हालचाली सुरु झाल्याचे दिसत आहे.
Sources: Union Council of Ministers likely to meet tomorrow; BJP President Amit Shah to host a dinner for NDA leaders tomorrow pic.twitter.com/kyPAHAf3U2
— ANI (@ANI) May 20, 2019
तर दुसरीकडे एक्झिट पोलच्या आकडेवारीमुळे विरोधकांच्या गोटात मात्र शांतता पसरली आहे. भाजपप्रणित एनडीएला यंदा बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. परिणामी यंदा त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, असा दावा विरोधकांकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी केला जात होता. मात्र, एक्झिट पोलच्या आकडेवारीने विरोधकांच्या मनसुब्यांना सुरुंग लावला आहे. यानंतर विरोधकांनी तुर्तास वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून सर्वजण २३ मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालांकडे डोळे लावून बसले आहेत.
देशातील प्रमुख एक्झिट पोलचा अंदाज
* टाइम्स नाऊ – व्हीएमआर: एनडीए – ३०६, यूपीए- १३२, अन्य – १०४
* इंडिया न्यूज – एनडीए- २९८, यूपीए- ११८, अन्य – १२७
* रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीने दोन एक्झिट पोल केले आहेत. यातील एक एक्झिट पोल सीव्होटर तर दुसरा एक्झिट पोल ‘जन की बात’चा आहे. त्यानुसार
रिपब्लिक टीव्ही- सीव्होटर : एनडीए- २८७, यूपीए – १२८, अन्य – १२७
रिपब्लिक टीव्ही – जन की बात: एनडीए- ३०५, यूपीए- १२४, अन्य – ८७
* एनडीटीव्ही: एनडीए- ३००, यूपीए- १२७, अन्य – ११५
* आयएएनएस- सी व्होटर: भाजप- २३६, काँग्रेस – ८० एनडीए- २८७
* नेता- न्यूज एक्स: एनडीए- २४२, यूपीए – १६४, अन्य – १३६
* न्यूज १८ : एनडीए- २९२- ३१२, यूपीए – ६२- ७२
* एबीपी – नेल्सन : एनडीए – २६७, यूपीए – १२७, अन्य १४८ (भाजप – २१८, काँग्रेस ८१)