गांधीनगर : गुजरातमध्ये झालेल्या ७५ नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी मागच्या निवडणुकांच्या तुलनेत त्यांचं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं मात्र कमबॅक केलं आहे. गुजरातमधल्या ४३ नगरपालिकांमध्ये भाजप, २७ नगरपालिकांवर काँग्रेसचा विजय झाला आहे. ५ नगरपालिकांवर अपक्षांनी विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं होम पीच असणाऱ्या वडनगरमध्ये भाजपनं २८ पैकी २७ जागा जिंकल्या आहेत.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणींचा बालेकिल्ला असलेल्या राजकोटमधल्या ५ नगरपालिकांपैकी ३ ठिकाणी भाजप आणि २ ठिकाणी काँग्रेसचा विजय झाला आहे. २०१७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजकोट जिल्ह्यातल्या ७ जागांपैकी ४ जागांवर भाजपचा आणि ३ ठिकाणी काँग्रेसचा विजय झाला होता. राजकोट पश्चिम या मतदारसंघातून विजय रुपाणी निवडून आले होते.
मागच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये ७५ पैकी ११ ठिकाणी काँग्रेसचा विजय झाला होता. यावेळी मात्र काँग्रेसची आकडेवारी १६नं वाढून २७ झाली आहे. २०१६ साली झालेल्या १२३ नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला १०७ जागांवर विजय मिळाला होता.
२०१७ साली झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीतही भाजपला जोरदार धक्का बसला होता. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी यांच्याबरोबर राहुल गांधींनी गुजरातमध्ये भाजपच्या नाकी नऊ आणले. विधानसभा निवडणुकीत भाजपला १०० पेक्षा कमी जागा मिळाल्या. २२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच गुजरातमध्ये भाजपची दमछाक झालेली पाहायला मिळाली होती.