नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात करतारपूर कॉरिडोअरवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी भारतातील शीख बांधवांना कर्तारपूर गुरुद्वारात जाता यावे, यासाठी मार्गिका खुली करण्याची तयारी दाखवली होती. भारत-पाक द्विपक्षीय संबंधांच्यादृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात होते. मात्र, आता पाकिस्तान या आश्वासनावरून घूमजाव करणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
या कॉरिडोअरच्या बांधणीदरम्यान समन्वयासाठी पाकिस्तानकडून एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यामध्ये पाकिस्तानने खलिस्तान समर्थकांचा समावेश केला आहे. तसेच ही मार्गिका खुली झाल्यानंतर भारतातून दररोज ५००० लोक करतारपूर गुरुद्वारात जातील, असे ठरले होते. मात्र, पाकिस्ताने आपली भूमिका बदलत दररोज केवळ ७०० भारतीयांनाच याठिकाणी जाता येईल, असे सांगितले आहे. याशिवाय, या कॉरिडोअरचा भाग म्हणून झीरो लाईनवर एक उड्डाणपूल बांधायचे ठरले होते. भारताच्या बाजूने त्यासाठीचे कामही सुरु झाले होते. परंतु, पाकिस्तानने आता त्यालाही विरोध दर्शवल्याचे समोर आले आहे.
या उड्डाणपुलाऐवजी येथे केवळ रस्ता बांधण्यात यावा. मात्र, उड्डाणपूल न बांधल्यास रावी नदीने पावसाळ्यात आपली निर्धारित पातळी ओलांडल्यास याठिकाणी पूर येऊ शकतो, असे भारताचे म्हणणे आहे. हा भाग रावी नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात येतो. त्यामुळे उड्डाणपूल न बांधल्यास यात्रेकरू वाहून जाण्याचा धोका आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार क्रॉस ड्रेनेजसह मार्गिका ( कॉरिडोअर) बांधायाल पाकने यापूर्वी मान्यता दिली होती. मात्र, आता ते केवळ रस्ता बांधायचाच हट्ट धरून बसले आहेत. मात्र, त्याने फायदा होणार नाही, असे एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितले.
मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार या सगळ्यासाठी पाकिस्तानमधील आर्थिक टंचाई कारणीभूत आहे. भारताने करतारपूर मार्गिकेच्या निर्मितीसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर पाकिस्ताननेही यासाठी १०० कोटींची तरतूद केली होती. यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत चार बैठकाही झाल्या होत्या. त्यावेळी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चाही झाली होती. मात्र, पाकिस्तानने आता अचानक आपली भूमिका बदलल्याने अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.