देवाचं नाव घेत आनंद महिंद्रा यांनी लिहीलेली नवी पोस्ट इतकी का वाचली जातेय? एका क्षणात डोळे उघडणारे शब्द...

Anand Mahindra : भारतीय उद्योग विश्वात कमालीची लोकप्रियता मिळवत सोशल मीडियावरही तितकीच लोकप्रियता असणारं एक नाव म्हणजे आनंद महिंद्रा.   

सायली पाटील | Updated: Jan 9, 2025, 11:17 AM IST
देवाचं नाव घेत आनंद महिंद्रा यांनी लिहीलेली नवी पोस्ट इतकी का वाचली जातेय? एका क्षणात डोळे उघडणारे शब्द...  title=
businessman Anand Mahindra shares pic he took at traffic light with thoughtful message

Anand Mahindra : सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करत या माध्यमातून आपल्याशी संलग्न असणाऱ्या अनेकांनाच आनंद महिंद्रा कायमच जगाची एक वेगळी बाजू दाखवत असतात. एखादा नवा प्रकल्प असो किंवा एखादा नवा विचार, नवी संकल्पना. त्यांच्या नजरेत आलेली कोणतीही गोष्ट कधीच अंधारात राहत नाही. उलटपक्षी ती गोष्ट याच सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आंद महिंद्रा सातत्यानं करताना दिसतात. सध्या त्यांची चर्चेत असणारी अशीच एक पोस्ट विचार करायला भाग पाडत आहे. 

महिंद्रा यांनी नुकतंच X च्या माध्यमातून एक बोलका फोटो पोस्ट केला. रस्त्यानं जाताना अनेकदा काही असे प्रसंग नजरेस पडतात जे फोनच्या कॅमेरामध्ये टीपल्यावाचून आपण पुढे जात नाही. महिंद्रा यांचंही काहीसं असंच झालं. कोणा एका रस्त्यानं प्रवास करताना त्यांना वाहतूक कोंडीदरम्य़ान एका स्कूटरवर दोन माणसं देवाची फोटोफ्रेम नेताना दिसली. 

ही फ्रेम अशा पद्धतीनं ठेवण्यात आली होती, की जणू त्यात दिसणारा देव दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीकडे कुतूहलानं पाहतच आहे. हा क्षण टीपत तो फोटो शेअर करताना महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'अतिशय गर्दीच्याच वेळी वाहतूक कोंडीदरम्यान हा फोटो टीपता आला. देव आपल्याकडे कायमच पाहत असतो. (पण, तरीही हेल्मेट असणं/ वापरणं कधीही उत्तम)'. 

हेसुद्धा वाचा : जावई भारतीय का नाहीत? आनंद महिंद्रा यांना प्रश्न विचारताच त्यांच्या एका उत्तरानं सगळे शांत

 

महिंद्रा यांनी कंसात लिहिलेली ही ओळ अतिशय महत्त्वाची असून, ती खरंच विचार करायला भाग पाडणारीही आहे. अनेकदा घाईघाईत किंवा मग जाणीवपूर्वक अनेक दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर न करता नियमांची पायमल्ली करत वाहन चालवतात. पण, त्यांचा हा हलगर्जीपणा त्यांच्यासह सोबत असणाऱ्या व्यक्तीसाठीही धोक्याचा ठरू शकतो हे मात्र नाकारता येत नाही. 

आनंद महिंद्रा यांनी केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाली आणि ही पोस्ट पाहणाऱ्या प्रत्येकालाच त्यांनी लिहिलेलं कॅप्शन पटलं. या पोस्टवर नेटकरी व्यक्तही झाले. काहींनी सुरक्षित प्रवासाविषयी आपले विचार मांडले. आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टविषयी तुमचं काय मत?