Jammu Kashmir News : जम्मू काश्मीर भागामध्ये होणाऱ्या दहशतवादी कारवाया काही कमी झाल्या नसून, संरक्षण यंत्रणा या सर्व दहशतवादी मनसुब्यांना समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे. याच धर्तीवर बुधवारी जम्मू काश्मीर पोलिसांनी गांदरबल जिल्ह्यात रविवारी मजुरांच्या निवासावर हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांची छायाचित्र प्रसिद्ध केली.
सातजणांनी या हल्ल्यात प्राण गमावला असून, अनेकजण जखमी झाल्याचं वृत्त घटनास्थळावरून समोर आलं होतं. प्राथमिक माहितीनुसार गांदरबल येथील गगनगीर भागातील मजुरांच्या वस्तीत असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये ही दृश्य टीपण्यात आली. ज्यामुळं दहशतवाद्यांचे चेहरे स्पष्ट पाहता आले.
सध्या सोशल मीडियावरही या दहशकवाद्यांची छायाचित्र व्हायरल होत असून, यामध्ये त्यांच्याकडे अमेरिकी बनावटीच्या एम4 कार्बाईन आणि एके 47 रायफल पाहायला मिळत आहे. शिवाय या दहशतवाद्यांच्या चेहऱ्यावर सूडभावनाही अगदी स्पष्टपणे दिसत आहे.
गांदरबल येथे करण्यात आलेल्या या भ्याड हल्ल्यात बडगाम येथील रहिवासी डॉक्टरसह इतर 6 जणांचा मृत्यू ओढावला. काश्मीरमध्ये Z-Morh tunnel बांधणीसाठी APCO Infratech या कंपनीच्या वतीनं हे सर्वजण इथं कामासाठी रुजू होते.
20 ऑक्टोबर रोजी, सायंकाळी साधारण 7.25 वाजता काही कामगार भोजन सभागृहामध्ये बसले होते. तर, काही या दिशेनं येत होते. त्याचवेळी हा हल्ला करण्यात आला. बोगद्यासाठीचा रस्ता सुरू होतो तिथंच कामगारांची ही वस्ती होती. ज्याच्या एका बाजूला महाकाय डोंगररांगा आणि दुसऱ्या बाजुला श्रीनगर- लेह महामार्ग आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि एनआयएच्या काही अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली.
सदर प्रकरणी तातडीनं घटनास्थळासह नजीकच्या भागांमध्ये संरक्षण यंत्रणेनं शोधमोहिम सुरु केली. तपासाअंतर्गत 40 जाणांची चौकशीही करण्यात आली असून, दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठीच आता केंद्रानंही कठोर पावलं उचलल्याचं पाहायला मिळत आहे.