Chardham Yatra Kedarnath Dham : चारधाम यात्रेचं महत्त्वं प्रचंड असून, या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी वाढताना दिसत आहे. निसर्गाच्या कुशीत दडलेल्या चार धामांचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येनं भाविक येतात. यंदाही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर चारधाम यात्रेची सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्या सत्रात (Gangotri) गंगोत्री आणि यमुनोत्री (Yamunotri) धामची कवाडं खुली करण्यात आली. ज्यानंतर केदारनाथ धामची कपाटं 25 एप्रिल 2023, मंगळवारी सकाळी 6.20 मिनिटांनी भाविकांसाठी खुली करण्यात आली.
एएनआय या वृत्तसंस्थेकडून मंदिराची कवाडं खुली होतानाच्या क्षणांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला. जिथं हे मंत्रमुग्ध करणारे क्षण पाहता येत आहेत. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार मंदिराचे मुख्य पुजारी जगदगुरू रावल भीमा शंकर लिंग शिवाचार्य यांनी मंदिराची कवाडं खुली केली. अतिशय सुरेखरित्या सजावट करण्यात आलेल्या या केदारनाथ मंदिराबाहेर आतापासूनच भाविकांची रिघ पाहायला मिळत आहेत.
#WATCH | Uttarakhand: The portals of Kedarnath Dham opened for devotees. Kedarnath Temple Chief Priest Jagadguru Rawal Bhima Shankar Ling Shivacharya opened the portals. pic.twitter.com/WjPf2fcYdg
— ANI (@ANI) April 25, 2023
केदारनाथ मंदिराची कवाडं खुली होताच मंदिर परिसरात आणि सबंध केदार घाटीमध्ये हर हर महादेवचा घोष दुमदुमू लागला. सैन्याच्या बँड पथकाकडून मंदिराची कवाडं खुली होण्याआधी इथं कलाही सादर करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्रातून एका ढोल ताशा पथकानंही केदारनाथ मंदिरापाशी उपस्थित राहून आपली कला शंकराचरणी अर्पण केली.
मागील काही दिवसांपासून सातत्यनं बदलणारं हवामान आणि केदार घाटी परिसरात होणारी हिमवृष्टी पाहता उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भाविकांना हवामानाचा अंदाज घेऊनच यात्रेची आखणी करण्याचं आवाहन केलं. दरम्यान दरवर्षीप्रमाणं यंदाही केदारनाथ मंदिर मार्ग आणि परिसरामध्ये होणारी भाविकांची गर्दी पाहता यंत्रणांनी सर्व आवश्य तयारी केल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अती बर्फवृष्टीमुळं तूर्तास प्रशासनाकडून 30 एप्रिलपर्यंत चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरुंची नोंदणी थांबवण्यात आली आहे.
केदारनाथ धामची कवाडं खुली झाल्यानंतर आता त्यामागोमाग 27 एप्रिल रोजी बद्रीनाथ धाम (Badrinath Dham 2023) मंदिराची कवाडं खुली होणार आहेत. सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी विधीवत पूजेनंतर द्वार उघडतील. ज्यानंतर चारही धाम भाविकांच्या भेटीसाठी सज्ज असतील.