अहमदाबाद : गुजरातमध्ये कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपाविरोधात जोरदार रान उठवले आहे. राहुल गांधींनीही मुद्देसुदपणे प्रश्न उपस्थीत करत भाजपला चांगलेच जेरीस आणले आहे. मात्र, चांगली सुरूवात होऊनही कॉंग्रेस सध्या अडचणीत आली आहे. गुजरातमध्ये कॉंग्रेसच्या एका विश्वासू सहकाऱ्याने मोठ्या प्रमाणात जागांची मागणी केली आहे.
गुजरातमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी आघाडी उभारणे गरजेचे असल्याची घोषणा जनता दलाच्या शरद यादव यांनी यापूर्वीच केली होती. मात्र, गुजरातमध्ये याच जनता दलाने (शरद यादव गट) प्रदेश कॉंग्रेसकडे आज चक्क 25 जागांची मागणी केली. शरद यादव गटाचे प्रदेशाध्यक्ष छोटू वासवा यांनी ही मागणी केली. शरद यादव यांचा गट कॉंग्रेसचा महत्त्वपूर्ण सहकारी आहे. छोटू वासवा हे मागच्या वेळी गुजरातमध्ये झालेल्या निवडणूकीत जनता दलाचे निवडून आलेले एकमेव आमदार आहेत. तसेच, 8 ऑगस्ट रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत वासवा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. ज्याचा परिणाम कॉंग्रेसचे अहमद पटेल विजयी होण्यात आणी अमित शहा यांना धोबिपछाड मिळण्यात झाला होता.
वासवा यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, आम्ही केवळ एक किंवा दोन जागांवर समाधान मानणार नाही. आम्हाला 25 जागा हव्या आहेत. महत्त्वाचे असे की, गुजरातमधील राजकीय स्थिती पाहता कॉंग्रेसही एकहाती निवडणूक लढवून विजय मिळविण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कॉंग्रेसला आघाडीही हवी आहे आणि जागाही जास्त लडवायच्या आहेत. अशा स्थितीत कॉंग्रेससमोर तिकीट वाटप करताना मोठा दबाव आहे. हा दबाव जसा पक्षांतर्गत आहे. तसाच, तो मित्रपक्षांकडूनही आहे.
दोन टप्प्यात निवडणूक
दरम्यान, गुजरातमध्ये विधासभेच्या 182 जागांसाठी दोन टप्प्यात निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी कॉंग्रेस 70 उमेदवारांची पहिली यादी 16 नोव्हेंबरला जाहीर करणार आहे.