नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित होणाऱ्या आरएसएसच्या कार्यक्रमासाठी राहुल गांधींना आमंत्रण मिळाल्याची चर्चा आहे. या दरम्यान काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्षांना मोलाचा सल्ला दिलाय. राहुल गांधी यांनी आरएसएसच्या कार्यक्रमाला जाऊ नये, असं या नेत्यांनी सुचवलंय. आरएसएस विषाप्रमाणे आहे त्याची चव घेऊ नये, त्याच्याजवळ जाणाऱ्यांचं नुकसानंच होतं, असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस कोअर ग्रुपच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधींना हा सल्ला दिलाय.
राहुल गांधींनी अनेकदा आरएसएसवर तीव्र शब्दांत टीका केलीय. त्यांनी आरएसएसची तुलना अरबी संघटना 'मुस्लिम ब्रदरहुड'शी केली होती.
आरएसएसबद्दल राहुल गांधींची धारणा बदलण्यासाठी त्यांना आरएसएस आपल्या 17-19 सप्टेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात आमंत्रण देऊ शकतं, यासाठी राहुल गांधींना रितसर निमंत्रण पाठवलं जाऊ शकतं, अशी चर्चा सुरू आहे.
यापूर्वी जून महिन्यात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आरएसएसनं एका कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं होतं. यानंत मुखर्जी यांनी नागपूर स्थित संघाच्या हेडक्वार्टरला जाऊन देशप्रेमाबद्दल आपले विचार स्पष्ट शब्दांत मांडले होते. परंतु, तरीही यानंतर प्रणव मुखर्जी यांचे काही एडिटेड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये मुखर्जी राष्ट्रगीतासाठी संघाप्रमाणे छातीशी हात धरून उभे असलेले दिसत होते... परंतु, हे फोटो खोटे असल्याचं काही वेळांतच स्पष्टही झालं होतं. या फोटोंवरून मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी कठोर शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली होती. कार्यक्रमाआधी शर्मिष्ठा यांनीही आपल्या वडिलांना आरएसएसच्या मंचावर न जाण्याचा सल्ला दिला होता.