नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून भाजपाशी सुरु असलेल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमारांच्या जनता दल संयुक्त (जदयू) पक्षाने महाआघाडीत दाखल होण्याचे संकेत दिले आहेत. जदयूचे नेते के.सी. त्यागी यांनी यासंदर्भात सूचक भाष्य केले. त्यांनी म्हटले की, काँग्रेसने प्रथम लालूप्रसाद यादव यांच्या राजदसारख्या भ्रष्टाचारी पक्षाविषयीची भूमिका स्पष्ट करावी. त्याशिवाय आम्हाला महाआघाडीत सामील होण्याविषयी काँग्रेसशी बोलता येणार नाही, असे त्यागी यांनी म्हटले. दरम्यान, आगामी काळात जदयू मणीपूर, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या चार राज्यांमध्ये स्वबळावर लढणार असल्याचेही त्यागींनी सांगितले. काही प्रसारमध्यमे आम्ही भाजपाशी छुपी युती केल्याचे सांगत आहेत. मात्र, आम्ही स्वतंत्रपणेच लढणार असून भाजपाला पाठिंबा किंवा त्यांचा विरोधही करणार नसल्याचे के.सी. त्यागी यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने भाजपाला रोखण्यासाठी महाआघाडीचा चक्रव्यूह रचण्यासाठी रणनीती आखली आहे. कर्नाटकमध्ये झालेली विधानसभा निवडणूक आणि पालघरची पोटनिवडणूक यानंतरच्या समीकरणानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्षांची मोट बांधून भाजपाविरोधात महाआघाडी करण्याचा काँग्रेसचा निर्धार आहे.
Until and unless Congress clears its stand on a corrupt party like RJD, we don't know how to communicate with them any further: KC Tyagi, JD(U) pic.twitter.com/VyZQAC4z4d
— ANI (@ANI) July 8, 2018