मुंबई : राज्यातले मंत्री, मुख्यमंत्री एवढंच नव्हे, तर पंतप्रधानांनीही सावधगिरीचा इशारा देण्याचं कारणही तसंच आहे. देशात कोरोनाची तब्बल 230 रूपं आतापर्यंत आढळली असून कोरोना सातत्यानं म्युटेट होतोय. यातलं कोणतं रूप हाहाकार माजवेल, हे सांगणं कठीण आहे.
भारतात कोरोना व्हायरसनं आतापर्यंत एकदोन नव्हे, तर तब्बल 230 वेळा आपलं रूप बदलल्याचं आता स्पष्ट झालंय. यातले सगळे म्युटेशन्स माणसांसाठी हानीकारक नसले, तरी काही म्युटेशन मात्र मोठं नुकसान करू शकतात, असं मानलं जातंय. यातलेच डेल्टा आणि डेल्टा प्लस हे व्हेरियंट सध्या देशात धुमाकूळ घालतायत. आता ए वाय 3 नावाचा आणखी एक व्हेरियंट सापडला असून त्याची तीव्रता अद्याप समजलेली नाही. अमेरिकेनंतर भारत दुसरा असा देश आहे जिथे डेल्टाचे तीन-तीन म्यूटेशन सापडले आहेत.
दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना व्हायरस अधिक धोकादायक होऊ शकतो, असा इशारा दिलाय. कोरोना साथीचं आतापर्यंत रूप हे फक्त ट्रेलर होतं. यापेक्षा आणखी भयानक चित्र आपल्याला पाहायला मिळणार असल्याचं WHOनं म्हटलंय. येत्या काळात कोरोनाचे आणखी नवनवे व्हेरियंट पसरू शकतात आणि त्यावर नियंत्रण मिळवणं अवघड होऊ शकतं, असं संघटनेच्या आपतकालीन समितीनं म्हटलंय.
अलिकडे सापडलेल्या एवाय 3 व्हेरियंट हा डेल्टा आणि डेल्टा प्लसपेक्षा वेगळा असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. तो किती वेगानं पसरतो आणि किती घातक परिणाम करतो, यावर कोरोनाची तिसरी लाट किती गंभीर असेल, हे निश्चित होणार आहे. त्यामुळे सध्या तरी प्रत्येकाने काळजी घेणं हाच उपाय आहे.