नवी दिल्ली : पंतप्रधान यांचे कालचे भाषण ऐकलं, वाचलं. ते ऐकून वाईट वाटलं. कोरोना महामारीचा उगम हा चीनमधून झालाय महाराष्ट्रातून नाही. तरीही महाराष्ट्र सरकारवर खापर फोडलं जातंय. हा कोरोना काळात कार्य केलेल्या डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांचा अपमान आहे, असं शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी म्हटलंय.
संसदेत ते भाषण मोदी यांचं होतं. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. पण, त्यांनी महाराष्ट्राबाबत वक्तव्य केलंय म्हणून महाराष्ट्र सरकारकडून त्याचा खुलासा होईलच. पण, देशातील काही राज्यात महाराष्ट्रामुळे महामारी आली असं म्हणणं हा येथल्या सरकार, डॉक्टर आणि नर्स यांचा अपमान आहे.
जर महाराष्ट्राने इतर राज्यात कोरोना पसरवला असेल तर मग Who ने इथल्या धारावी पॅटर्नची वाहवा का केली? सोनू सूद त्यावेळी कोणाचे होते? राज्यपालांच्या हस्ते सत्कार करणारे कोण होते? कौतुक कुणी केलं? असे सवाल उपस्थित करतानाच याबाबत भाजपच्या प्रमुख नेत्यांनी पुढं येऊन बोलायला हवं, असं ते म्हणाले.
सोमय्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जावं
भाजप नेते किरीट सोमय्या दररोज नवनवीन आरोप करताहेत. त्यांनी कायद्यासमोर जावं, आंतरराष्ट्रीय न्यायालयात जावं. जर, शिवसेनेनं खुनी हल्ला केला असेल तर कायदा आपलं काम करेलच. या देशात कायदा आहे. न्यायालयाचे काही आम्ही मालक नाही. फक्त आरोपांची राळ उठवून चालत नाही, असा टोला त्यांनी लगावला.