इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या स्फोटाचा तपास एनएसजीकडून

हा दहशतवादी हल्ला 

Updated: Jan 31, 2021, 11:08 AM IST
इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या स्फोटाचा तपास एनएसजीकडून title=

नवी दिल्ली :  दिल्लीत इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या स्फोटाचा तपास आता एनएसजीनेही सुरू केला आहे. एनएसजीच्या स्फोटक तज्ज्ञांनी या भागात महत्त्वाची सँपल्स गोळा केली आहेत. याशिवाय या स्फोटांप्रकरणी दोन इराणी नागरिकांचीही चौकशी करण्यात येत आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचं इस्रायलच्या राजदुतांनीही म्हटलं आहे. मात्र याबाबत आश्चर्य वाटत नाही. अशा हल्ल्याच्या इनपूट्स होत्या, काही दिवसांपासून सतर्कता बाळगण्यात येत होती असं राजदुतांनी म्हटलं आहे. 

स्फोटाचा तपास करताना घटनास्थळावरुन वेगवेगळं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. त्यात एक गुलाबी रंगाचा दुपट्टा आहे जो अर्धवट जळालेल्या अवस्थेत आहे. त्याचा ह्या स्फोटाशी काही संबंध आहे का याचा शोध तपास यंत्रणा करतायत. दरम्यान ह्या स्फोटाची जबाबदारी जैश ए उल हिंद या दहशतवादी संघटनेनं घेतली आहे. 

स्फोटचा तपास करण्यासाठी अब्दूल कलाम रोडवरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आलं आहे. पण पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार परिसरातले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे हे कामच करत नव्हते. ते बंद आहेत. जे कॅमेरे सुरु आहेत त्यातलं गेल्या तीन दिवसातलं फुटेज ताब्यात घेण्यात आलं आहे. सीसीटीव्ही बंद असल्यामुळे तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढणार आहे.

पिक अप, ड्रॉप गाड्यांचीही चौकशी इस्त्रायली दुतावासाजवळ येण्यासाठी ज्या भागातून कॅब प्रवाशांना पिक अप करतात आणि ड्रॉप करतात तिथल्या सगळ्या कॅबची चौकशी केली जातेय. त्यासाठी ओला उबेरशीही पोलीसांनी संपर्क केल्याची माहिती समोर येत आहे. किती जणांना नेमक्या त्याच ठिकाणी ड्रॉप केलं किंवा पिक अप केलं तेही तपासलं जातं आहे.